Pimpri News : काँग्रेसच्या ‘स्वबळा’ची खिल्ली तर शिवसेनेसोबत आघाडीचे अजितदादांचे स्पष्ट संकेत

एमपीसी न्यूज – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा करणा-या काँग्रेसची खिल्ली उडवत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) दिले. फक्त आपल्यासोबत येणाऱ्यांनी आपली ताकद किती, राष्ट्रवादाची ताकद किती, याची पाहणी करून जागा वाटपाचा विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पिंपळेगुरव येथे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी आहे. मग, तिकीट वाटप कसे काय होणार, तीनचा प्रभाग आहे. कोणाला कोणाला तिकीट मिळणार असे सगळे विचार करत आहेत. पण, काँग्रेसच्या नेतृत्वाने आम्ही निवडणुका ‘स्वबळावर’ लढणार असे आधीच सांगितले. त्यामुळे त्यांचा प्रश्नच मिटला. ते स्वबळावर लढणार आहेत, आता कोणाचे बळ इथं किती आणि कोणाचे काय आहे. त्याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचे बळ चांगले आहे असेच समजून प्रत्येकाला शुभेच्छा देऊ.

शिवसेनेची राष्ट्रवादीबरोबर जाण्याची तयारी, मानसिकता आहे. त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. आपणही दोन पाऊले पुढे मागे सरकून त्याठिकाणी पुढे जायचे असते. तशा प्रकारची मानसिकता आपण ठेवायची असते. परंतु, ती ठेवत असताना जे आपल्याबरोबर येऊ पाहत आहेत. त्यांनी पण राष्ट्रवादीची इथे ताकद किती आहे, आपली किती आहे. त्या ताकदीच्या प्रमाणात जागा वाटप झाले पाहिजे. तर, आपली काहीच अडचण असायचे कारण नाही. एखाद्या ठिकाणी त्यांनी एकदोन पाऊले पुढे मागे व्हावे. एखाद्या ठिकाणी आपण एकदोन पाऊले मागे पुढे होऊ असे सांगत शिवसेनेसबोत आघाडीचे संकेत पवार यांनी दिले. तसेच महापालिकेत सत्तेत असलेला भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे हे पहिले ध्येय सर्वांचे आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.