Akurdi News: खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

एमपीसी न्यूज – आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, एकतानगर, विवेकनगर व सेक्टर 24 तसेच इतर भागात सुमारे एक वर्षापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आकुर्डी भागासाठी स्वतंत्र एचटी लाईन सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी केली.

याबाबत उपमुख्यंमत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले आहे. त्यात सय्यद यांनी म्हटले आहे की, वीज मंडळ कार्यालयाला अनेक वेळा संपर्क साधून नागरिकांची होणारी गैरसोय सांगितली. परंतु, त्यात काहीही सुधारणा होत नाही. शहरात एक दिवस सोडून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ज्या दिवशी पाणी असते. त्याच दिवशी सकाळी वीज पुरवठा खंडित होतो. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वरच्या मजल्यावर किंवा टेरेसवरील पाण्याची टाकी भरता येत नाही. नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

सध्या ‘वर्क फ्रॉम होम ‘ काम सुरु असल्याने कामात अडचण येते. सर्व व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होते. अगदी सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्यास मोबाईल चार्जिंग न झाल्याने विद्यार्थ्याना ऑन लाईन क्लासला अडचणी येतात. प्रत्येकवेळी प्राधिकरण भागात काही काम निघाले असल्यास आकुर्डी भागाचा पण विद्युत पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे आकुर्डी भागासाठी स्वतंत्र HT लाईन सुरू करण्याबाबत आपण निर्देश द्यावेत अशी मागणी सय्यद यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.