Alandi : आंदोलनकर्ते भगवान महाराज कोकरे यांची प्रकृती खालावल्याने केले रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षण, इंद्रायणी स्वच्छता यासह विविध (Alandi ) प्रश्नांसाठी हभप भगवान महाराज कोकरे मागील आठ दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी (दि. 8) जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आळंदी येथे भगवान महाराज कोकरे हे 1 नोव्हेंबर पासून विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. सर्व जातींचे समूळ उच्चाटन करावे. मराठा आरक्षणासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली. पण दिलेल्या मुदतीत आरक्षण नाही दिले तर सरकार काय भूमिका घेणार, याबाबत सरकारने सांगावे.

आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे. राज्य शासनाने केंद्राला तशी सूचना करावी. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मोफत करावे. केंद्र सरकारने समान नागरी कायदा लागू करावा. इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखावे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा. शेतीसाठी वीज 24 तास मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी कोकरे महाराज उपोषण करीत आहेत.

बुधवारी त्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस होता. बुधवारी सकाळी कोकरे महाराज यांचा रक्तदाब वाढला होता. तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांकडून कोकरे महाराजांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोकरे महाराजांनी नकार दिला असता प्रशासन आणि पोलिसांकडून त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि कोकरे महाराज यांच्यात झटापट झाली. आता त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

Pimpri : पिंपरी चिंचवड हे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक

दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित म्हणाले, “कोकरे यांचे आठ दिवसांपासून उपोषण सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी उपचार घेतले नाहीत. दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले. पण ते उपचार पुरेसे नव्हते.

तहसीलदार, मुख्याधिकारी आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांनी येऊन कोकरे महाराज यांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचे आश्वासन दिले. तरीही त्यांनी उपोषण मागे घेतले नाही. बुधवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. पोलिसांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

प्रशासनाने कोकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्याने दिघी पोलिसांनी कार्डियाक रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालयात दाखल करत असताना त्यांनी प्रचंड विरोध केला. मात्र त्यांचा जीव वाचवणे गरजेचे असल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.”

मी जनहितासाठी आंदोलन करीत आहे. मी कुठल्याही पक्षासाठी आंदोलन करत नाही. जर असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी माझी यमाच्या अध्यक्षतेखाली चौकशी लावावी. त्या चौकशीला देखील मी समोरा जायला तयार असल्याचे भगवान महाराज कोकरे (Alandi ) यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.