Alandi Crime : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; गोठ्यातील गायी सुद्धा असुरक्षित

एमपीसी न्यूज – शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. गोठ्यातील गाय देखील शहरात सुरक्षित नाही, याची प्रचिती आळंदी येथे आली आहे. आळंदी जवळ केळगाव येथे एका गोठ्यात बांधलेल्या दोन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि. 29) पहाटे उघडकीस आला.
ज्ञानेश्वर आत्माराम कडेकर (वय 30, रा. केळगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कडेकर यांचा केळगाव येथे त्यांच्या घराजवळ जनावरांचा गोठा आहे. सोमवारी (दि. 28) रात्री दहा वाजता ते गोठ्यातून जनावरांना वैरणपाणी करून घरी आले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोठ्यातून 50 हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरून नेल्या. मंगळवारी पहाटे पावणे चार वाजता हा प्रकार उघडकीस आला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरी, मोबईल फोन चोरी, घरफोडी असे चोऱ्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात आता गोठ्यातील जनावरे देखील असुरक्षित झाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.