Alandi : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर जीवघेणा हल्ला; पतीला अटक

एमपीसी न्यूज – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रोडने मारहाण केल्यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पतीला अटक केली आहे. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे ज्ञानदेवी कॉलनी आळंदी येथे घडली.

मछिंद्रनाथ उत्तमराव जोगी (वय 32) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. रेणुका मछिंद्रनाथ जोगी (वय 26, रा. ज्ञानदेवी कॉलनी, आळंदी) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मछिंद्रनाथ प्लम्बिंगचे काम करतो. तर रेणुका घरकाम करतात. ‘तू राकेश लक्ष्मण तापकीर याच्यासोबत का बोलतेस, तो घरी का येतो?’ अशी मछिंद्रनाथने विचारणा करून रेणुका यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. मछिंद्रनाथ याने रेणुका यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारले. याला रेणुका यांनी विरोध केला. त्यावेळी मछिंद्रनाथ याने पुन्हा रेणुका यांना मारहाण केली. यामध्ये रेणुका यांच्या डोक्यात, हात, पायावर गंभीर दुखापत झाली.

रेणुका यांनी आरडाओरडा केल्याने त्यांच्या शेजारी राहणारे रेणुका यांच्या मदतीला धावत आले. त्यांनी दोघांचे भांडण सोडवत रेणुका यांना पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत रेणुका यांनी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी मछिंद्रनाथ याला अटक केली. रेणुका यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.