Alandi News: नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

आरोपी नारायण हा सन 2011 पासून फरार होता. त्याला सन 2018 साली न्यायालयाने फरार म्हणून घोषित केले होते.

एमपीसी न्यूज – आपले वास्तव्य सतत बदलून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी तब्बल नऊ वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नारायण माणिकराव गाडेकर पाटील उर्फ नारायण यशवंत पाटील (वय 30, रा. पदमावती रोड, आळंदी ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील टॉप 25 आरोपींची यादी बनवून त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस आणि गुन्हे शाखा कामाला लागल्या होत्या.

आरोपी नारायण हा सन 2011 पासून फरार होता. त्याला सन 2018 साली न्यायालयाने फरार म्हणून घोषित केले होते. आरोपी नारायण याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात सन 2011 साली घरफोडी, जबरी चोरीचे तीन आणि 2008 साली फसवणुकीचा एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.

वर्ष 2011 साली जबरी चोरीचा गुन्हा केल्यानंतर आरोपी नारायण पळून गेला होता. तो वारंवार आपले अस्तित्व बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

मंगळवारी (दि.18) पोलीस शिपाई सागर जैनक यांना माहिती मिळाली की, आरोपी नारायण हरीओम आश्रम, अन्नपुर्णा मातानगर, आळंदी येथे आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला दुपारी पाच वाजता ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हे केले असल्याचे कबूल केले.

मागील तीन महिन्यांपासून गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस नारायणच्या मागावर होते. पद्मावती झोपडपट्टी, गाढवे वस्ती आणि इतर काही ठिकाणी त्याची माहिती काढून नातेवाईकांच्या माध्यमातून त्याची माहिती काढून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी नारायण याला अटक करून पुढील कारवाईसाठी आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी गंगाधर चव्हाण, विठठल सानप, हजरत पठाण, सचिन मोरे, यदु आढारी, त्रिनयन बाळसराफ, महेश भालचिम, राजकुमार हनमंते, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, प्रमोद ढाकणे, नाथा केकान, राहुल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.