Alandi : तब्बल नऊ दिवसांपासून इंद्रायणी नदी फेसाळलेली

एमपीसी न्यूज – मागील नऊ दिवसांपासून इंद्रायणी नदी फेसाळली (Alandi) आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. दररोज फेसाळलेली इंद्रायणी नदी दिसत असून देखील प्रशासन कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही.

3 जानेवारी रोजी इंद्रायणी नदी सिद्धबेट बंधाऱ्याजवळ फेसाळलेली दिसली. तीच परिस्थिती 4 जानेवारी आणि पुढील नऊ दिवस राहिली. इंद्रायणीचे फेसाळलेले पाणी आळंदी मधील घाटांवर येते. वारकऱ्यांसाठी इंद्रायणी नदीचे महत्व खूप आहे. अनेकजण इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. अनेकजण या पाण्यात स्नान देखील करतात. यामुळे वारक-यांमध्ये पोटाचे विकार आणि त्वचा विकार देखील पसरण्याचा धोका आहे.

इंद्रायणी नदीचे पाणी अनेक शेतकरी शेतीला देतात. रसायन मिश्रित पाणी शेतीला दिल्याने तिथे येणारा चारा आणि पिके यामुळे जनावरांसह माणसांना देखील धोका निर्माण झाला आहे. अनेकदा मृत माशांचा खच इंद्रायणी काठी पहायला मिळतो. कुपनलिकेत असे अशुद्ध पाणी येते, त्यामुळे (Alandi) ते पाणी पिणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. इंद्रायणी नदी काठच्या गावांमध्ये जाऊन वारकरी संस्था आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याचे दिसत आहे.

Pune : पोलिसांना सांगून गुन्हा दाखल न करण्यासाठी वकिलाने मागितली पाच लाखांची लाच

प्रशासनाकडून मात्र यावर कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन मग्न आहे. इंद्रायणी नदी उगमापासून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत कामे केली जाणार आहे. पण ती कामे होतील तेंव्हा होतील. आता सुरु असलेल्या इंद्रायणी प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इंद्रायणी स्वच्छतेसाठी मोठमोठे उपक्रम राबवले जातात. मात्र ते सर्व उपक्रम इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्यात वाहून जात असल्याचे दिसत आहे.

शुक्रवारी नितीन गडकरी आळंदीत

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने वारकरी केंद्रित बहुद्देशीय प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी (दि. 12) आळंदीत येणार आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी नितीन गडकरी आग्रही असतात. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदी प्रदूषणाची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत काय उपाययोजना करणार, हे पाहावे लागेल.

उपमुख्यमंत्री म्हणतात – हे एका दिवसात होत नाही

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी केंद्राच्या सहकार्याने राज्य शासनाकडून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. सध्या इंद्रायणी नदी प्रदूषित झाली असून त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी नदी सुधार प्रकल्प राबवला जाणार असून तो एका दिवसात होत नसून त्याला कालावधी लागतो, असे सांगितले.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा 577.16 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्ट 2023 मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला. राज्याने यास मान्यता दिली असून आता हा अहवाल केंद्राच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे (एनआरसीडी) सादर करण्यात आला आहे. एनआरसीडी कडून 60 टक्के अनुदान आणि राज्य शासन 40 टक्के अनुदान देणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षात इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला (Alandi) जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.