Alandi Road News: अतिक्रमणावर प्रशासनाकडून दिखाऊपणाची कारवाई, अतिक्रमण कायस्वरुपी हटवा; व्यापा-यांची मागणी

एमपीसी न्यूज – भोसरीतील आळंदी रस्त्यावरील दुकानासमोर लावण्यात येत असलेल्या हातगाडी, पथारी विक्रेत्यांमुळे दुकानदारांना व्यावसाय करणे अवघड होत आहे. महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणावर दिखाऊपणाची कारवाई केली जाते. महापालिका पथक जाताच पुन्हा फेरीवाले येऊन रस्त्यावर बसतात. परिणामी, वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण केलेल्या पथारी, हातगाडीवाल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आळंदी रोड व्यापारी संघटनेने केली आहे.

याबाबत महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी नानासाहेब मोरे यांना निवेदन दिले आहे. व्यापा-यांनी निवेदनात म्हटले आहे की, भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ वसली आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूला हातगाडीवाले व पथारीवाल्यांचेही अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. ग्राहकांना दुकानासमोर वाहने लावण्यासाठीही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे व्यावसायावर परिणाम होत आहे.

महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी हातगाडीवाल्यांना फक्त तोंडी सांगतात. पाच ते दहा मिनिटांसाठी तात्पुरत्या स्वरुपात अतिक्रमण हटवितात. दिखाऊपणाची कारवाई केली जाते. अधिकारी गेल्यानंतर पुन्हा पथारीवाले रस्त्यावर येऊन विक्री करतात. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न भेडसावत आहे. येथे अगोदरच वाहतूक कोंडी होते. त्यात या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने आळंदी रस्त्यावरील हातगाडीवाले व पथारीवाल्यांनी केलेले अतिक्रमण काढून टाकावे. ठोस कारवाई करावी. जे दुकानदार आपल्या दुकानाबाहेर हातगाडी वाल्यांना थारा देतात. त्या दुकानदारांवर सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी आळंदी रोड व्यापारी संघटनेने निवेदनातून केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.