Amit Gorkhe : निमित्त वाढदिवसाचे अन् लक्ष्य विधानसभेचे!

अमित गोरखे यांच्या शुभेच्छा फलकांवर विधानभवनाचा 'लोगो'

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू (Amit Gorkhe) आणि निकटवर्तीय असलेले भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांना मुंबईला जाण्याचे वेध लागले आहेत. कारण, गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघात झळकलेल्या सर्व शुभेच्छा फलकांवर विधानभवनाचा लोगो वापरण्यात आला आहे. त्यामुळे गोरखे हे आगामी विधानसभा निवडणूक पिंपरीतून लढविणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पिंपरी कमळावर जिंकण्याचे आदेश दिले आहेत.

अमित गोरखे यांचा आज शनिवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघात निगडीपासून ते दापोडीपर्यंत शुभेच्छा फलक झळकले आहेत. या फलकांवर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिका-यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. गोरखे यांनी वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. गोरखे हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना 2012 चा भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना गोरखे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्री दर्जा दिला होता. राज्यातील सत्ता गेल्यानंतर त्यांच्याकडे प्रदेश कार्यकारिणीत महत्वाचे असलेले सचिवपद सोपविले होते. आता पिंपरी विधानसभेचे निवडणूक प्रमुख गोरखे यांना केले आहे.

त्यामुळे फडणवीस यांच्या मर्जीतील आणि विश्वासातील अशी गोरखे यांची शहराच्या राजकारणात ओळख आहे. आता गोरखे (Amit Gorkhe) यांना मुंबईला जाण्याचे वेध लागले आहेत.

राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत. मागीलवेळी म्हणजे 2019 मध्येही गोरखे भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. परंतु, शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. त्यामुळे त्यांना अपक्ष दाखल केलेला अर्ज मागे घ्यावा लागला.

Nepal : नेपाळमध्ये भूकंपामुळे विध्वंस, आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू, मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ

आता 2024 च्या विधानसभेची त्यांनी तयारी सुरु केली आहे. पिंपरीत पक्ष संघटना बांधत आहे. यावेळी उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नसणार असे वाटत होते. पण, अचानक जुलैमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा गट भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाला. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पवार यांना समर्थन दिले. त्यामुळे गोरखे यांची पुन्हा अडचण झाली.

महायुतीत हा मतदारसंघ कोणाला सुटणार याची चर्चा सुरु असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी पिंपरी मतदारसंघ कमळावर जिंकायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बावनकुळे यांचा दावा आणि फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्यामुळे गोरखे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते, अशी शक्यता वर्तविली जाते.

तरुण चेहरा!

अमित गोरखे उच्चशिक्षित, तरुण आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात निगडी, प्राधिकरण, आकुर्डी या विकसित झालेल्या भागासह झोपडपट्यांचा समावेश आहे. शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंचा भाग या मतदारसंघात येतो. शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ पिंपरी कॅम्पचाही मतदारसंघात समावेश आहे. मतदारसंघात भाजपला मानणारा वर्ग आहे. त्यामुळे तरुण चेहरा पिंपरीकरांच्या पसंतीला उतरू शकतो, असे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.