Pune News : पाषाण-पंचवटी ते कोथरुड बोगद्यासाठी सल्लागार नियुक्तीला मान्यता

एमपीसी न्यूज – पाषाण-पंचवटी ते कोथरुडला जोडणाऱ्या प्रस्तावित बोगद्याच्या कामासाठी पूर्व-व्यवहार्यता अभ्यास (प्री-फीजिबिलिटी स्टडी) आणि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (एन्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट) अहवाल तयार करण्यासाठी मोनार्च सर्व्हेअर अण्ड इंजिनिअरिंग कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यासाठी आणि सल्लागार शुल्कापोटी 72 लाख 70 हजार रुपये देण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, कोथरुडमधील सुतारदरा ते पाषाण पंचवटी दरम्यान बोगदा तयार करून त्यातून रस्ता काढण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या बोगद्याचा समावेश शहराच्या विकास आराखड्यात करण्यात आलेला आहे. कोथरुड, औंध, बाणेर, पाषाण परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 250 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे.

रासने पुढे म्हणाले, पाषाण-पंचवटी ते कोथरुड दरम्यानच्या प्रस्तावित बोगद्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या (डीआरडीओ) हद्दीमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिकेची या संपूर्ण मार्गाच्या आखणीसाठी तयारी सुरू आहे. प्रस्तावित बोगद्याचा मार्ग निश्चित झाल्यानंतर संरक्षण आणि वन विभागाच्या जागांसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. स्थायी समितीने आज पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीस मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.