Arogyavardhini : आरोग्यवर्धिनी भाग दोन – कोविडग्रस्त महिलांची प्रसूती करणारे महापालिकेचे एकमेव आकुर्डी रुग्णालय; क्षयरोग विभागही सक्षम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आकुर्डी रुग्णालय नव्या आणि भव्य स्वरुपात सुरु झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 22 फेब्रुवारी 2022 रोजी कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल रुग्णालय आकुर्डी; या नावाने नव्या इमारतीची सुरुवात झाली आहे. (Arogyavardhini) नव्याने सुरु केलेल्या रुग्णालयात विविध विभाग सुरु करण्यात आले आहेत. कोवीड रुग्णांवरील उपचारांसह कोविड बाधित गरोदर महिलांची प्रसूती या रुग्णालयात होते. या रुग्णालयात क्षयरोग रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. आधुनिक मशीनच्या सहायाने अवघ्या दोन तासात क्षयरोगाचे निदान इथे केले जाते. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत क्षयरोग विभाग पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आला आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात विविध भागात रुग्णालये सुरु केली आहेत. नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कै .ह .भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल रुग्णालयाची स्थापना 22 फेब्रुवारी 2022 रोजी  करण्यात आली आहे. या रुग्णालयात प्रारंभी रुग्णांचे प्रमाण 150-160 इतके होते. सध्याचे रुग्णांचे प्रमाण 700-800 इतके वाढले आहे. विविध आजार असणारे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात. रुग्णालयात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असल्याचे रुग्णालयाला भेट दिल्यानंतर लक्षात येते. सर्व रुग्णांना चांगल्या सोई-सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सर्व वयोगटातील रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येत आहेत. रुग्णालयात Ture Nat Machines च्या सहाय्याने दोन तासात क्षयरोगाचे निदान केले जाते. खासगी रुग्णालयात अतिशय खर्चिक असलेली ही तपासणी आकुर्डी रुग्णालयात मोफत केली जाते. माफक दरात सुविधा दिल्या जातात.

 

 

प्रसूतीशी संबंधित किचकट शस्त्रक्रिया होतात

कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल आकुर्डी रुग्णालयात 100 बेड असून अतिदक्षता विभागातील बेडची संख्या 12 आहे. दुर्बिणीद्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया इथे केली जाते. त्यामध्ये काही स्त्रियांना अपत्यप्राप्तीसाठी गर्भाशय तसेच त्यालगत असलेल्या नलीका सुस्थितीत असणे गरजेचे असते. (Arogyavardhini) या नलिकेमध्ये काही दोष असल्यास महिलांना गर्भधारणा होत नाही. अशावेळी टयुबोप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया केली जाते. कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा अपत्यप्राप्ती हवी असेल तर ट्युबोप्लॅस्टि नावाची शस्त्रक्रिया देखील इथे केली जाते. गर्भाशयाच्या बाहेर वाढणाऱ्या गर्भावरील शस्त्रक्रिया (एक्टोपिक प्रेग्नन्सी/ Ectopic pregnancy) देखील या रुग्णालयात केली जाते.

 

आकुर्डी रुग्णालयात मिळतात या सुविधा

या रुग्णालयात स्त्री रोगाशी संबंधित सर्व शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी काढणे, सिझेरियन, तीन महिन्यापर्यंत गर्भपात, प्रसूती गृह ऑपरेशन विभाग, बालरोग विभाग, मानसोपचार तज्ञ विभाग, अतिदक्षता विभाग, अपघात विभाग, सर्दी ताप खोकला विभाग, दंत विभाग, फिजिओथेरपी विभाग, पॅथॉलॉजी, एक्स-रे, सोनोग्राफी‌, क्षयरोग विभाग, वैद्यकीय प्रमाणपत्र, जन्म मृत्यू विभाग, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम लसीकरण अशा विविध सुविधा पुरवल्या जातात.

 

महिन्याला होतात शेकडो प्रसूती

आकुर्डी रुग्णालयातील सुविधा परिसरातील रुग्णांसाठी सोयीच्या होत असल्याने या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांचा कल वाढत आहे. या रुग्णालयात प्रसूती गृह विभागात प्रत्येक महिन्याला 200-250 प्रसूती केल्या जातात. त्यात 60-70 टक्के सिझेरियनचे प्रमाण असते. कोविडबाधित गरोदर महिलांची प्रसूती व सिझेरियन या रुग्णालयात केले जाते.

 

वैदकीय आधिकारी डॉ. बाळासाहेब होडकर म्हणाले, “कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल आकुर्डी रुग्णालयात चांगल्या प्रकारच्या सोईसुविधा रुग्णांना दिल्या जातात. (Arogyavardhini) तसेच रुग्णालयात आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये गरोदर महिला, लहान मुले, नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या जातात. तसेच जेष्ठ नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. रुग्ण उपचारासाठी आकुर्डी रुग्णालयास प्राधान्य देत आहेत. त्यांना चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ”

 

रुग्णालयाचा संपर्क क्रमांक – 912068336714

 

– हेमांगी सूर्यवंशी

 

(पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे लहान रूपातून नव्या स्वरूपात परिवर्तन केलेल्या सुसज्ज रुग्णालयांच्या सेवा सुविधांची माहिती ‘आरोग्यवर्धिनी’ या सदरातून दर आठवड्याला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुढील सदरात आपण नवीन भोसरी रुग्णालयाची माहिती पाहणार आहोत.) 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.