Ashwin: ओळख मराठी महिन्यांची – भाग 7 – नवरात्र व दसऱ्याच्या धामधुमीचा महिना

एमपीसी न्यूज (रंजना बांदेकर) – अश्विन महिना… मराठी महिन्यांची माहिती (Ashwin)लेखमालेतील हा सातवा लेख.

आला अश्विन अश्विन l
मऊ धुकं पांघरून l
साज दवाचं लेऊन l
उन केशरी पिऊनll

अश्विन महिना हिंदू पंचांगातील सातवा महिना. अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला अश्विन नक्षत्र लागते त्यामुळे याचे नाव अश्विन असे पडले आहे. त्याचप्रमाणे देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांच्या वरून देखील हा महिना ओळखला जातो.

आकाशातील पावसाळी ढगाळ वातावरण जाऊन आकाश निरभ्र होऊ लागते. मन प्रसन्न करणारे गार वारे वाहू लागतात. शेतातील पिकांत दाणा धरू लागतो. यावरूनच समजते की अश्विन आला.

आला अश्विन अश्विन l
शेतामध्ये झुले सोने l
मन आले बहरून l
दारी झेंडूची तोरण ll

अश्विन महिना हा देवीचा महिना आहे. महिन्याच्या सुरुवातीपासूनच शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होते.

उधळण होऊन नवरंगाची ,
केली उपासना देवीची l
नवरात्रीच्या मुहूर्तावर घटस्थापना केली,
रंग रांगोळी काढली दारी,
पानाफुलांची तोरणे लावली।।

नवरात्र उत्सवासाठी मातीचे घट, फुले, फळे यांची जमवाजमव सुरू होते. घरदार स्वच्छ केले जाते. काही ठिकाणी मातीत कडधान्य पेरली जातात व त्यात देवीचा घट स्थापन केला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस आरती, नैवेद्य, गरबा व अखंड लावलेला दिवा यामुळे वातावरण मंगलमय होऊन जाते.

Bopodi : बोपोडी येथे रक्तदान शिबीरात प्रतिसाद, 113 जणांचे रक्तदान

भोंडल्यासाठी फेर धरून गाणी म्हटली जातात. ‘ऐलमा, पैलमा गणेश देवा’ पासून, ‘आड बाई अडोणी’पर्यंत सगळी गाणी म्हटली की, खिरापत ओळखली जाते. यामध्ये मोठ्या स्त्रिया देखील अगदी आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून जातात.
नवरात्रीचे नऊ दिवस संपले की, दहाव्या दिवशी येतो दसरा!

दसरा सण मोठा l
नाही आनंदाला तोटा ll

दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते कारण याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला होता. पूर्वीच्या काळी राजे महाराजे दसऱ्यापासून सीमोल्लंघन सुरू करायचे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून वाटतात.

मनसोक्तपणे देऊन सोने
चेहरा ठेवून सदैव हसरा l
देऊन घेऊन प्रेम आनंद असा
साजरा होतो दसरा ll

या महिन्याच्या शेवटी सुरू होते ती दिवाळीची तयारी. अशा या आनंदात आणि उत्साहात अश्विन महिना कसा संपतो तेच कळत नाही.

आपणा सर्वांना देवीचा आशीर्वाद मिळत सदैव मिळत राहो हीच सदिच्छा!

रंजना बांदेकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.