Talegaon Dabhade News : शहरातील विविध भागांतील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागांतील 21 रस्त्यांचे डांबरीकरणाचे  काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याशिवाय आणखी चार रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. या सर्व रस्त्यांवर सुमारे 12 कोटी 44 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत हे रस्ते मंजूर असून त्याची निविदा प्रक्रिया  पूर्ण झालेली आहे. या रस्त्यांसाठी 9 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुमारे 3 कोटी रुपये खर्चाचे 4 महत्त्वाचे रस्तेही केले जाणार आहेत. त्यामध्ये जिजामाता चौक ते घोरावाडी स्टेशनपर्यंत एक कोटी, सोमाटणे फाटा ते तळेगाव रस्ता एक कोटी रुपये, जव्हेरी कॉलनी अंतर्गत रस्ते 60 लाख रुपये,तसेच  वीज मंडळ कार्यालय ते चाकण रस्ता 40 लाख रुपये खर्च करण्यात  येणार आहे.

तळेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील दाभाडे आळी  ते राम मंदिर रस्ता, मस्करनेस कॉलनीतील अंतर्गत रस्ता, राजगुरू कॉलनीतील रस्ता, कडोलकर कॉलनीतील रस्ता, शिवाजी टॉकीज जवळील रस्ता, वतन नगर मधील रस्ता, स्टेशनमधील तुळजाभवानी मंदिरा समोरील रस्ता,संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेच्या जवळील रस्ता, यशवंत नगर मधील भक्ती पार्क  मधील रस्ता,  तसेच तपोधाम कॉलनीतील रस्ते, प्रभाग क्रमांक एक मधील विविध अंतर्गत रस्ते, गाव भागातील  सुभाष चौक  ते डोळसनाथ मंदिर ते गणपती चौक रस्ता, खडक मोहल्ला ते भोई आळी रस्ता, तर हरणेश्वर कॉलनी  येथील अंतर्गत रस्ते  सुधारणा  करणे, आदींचा यात समावेश आहे.

लवकरच या रस्त्यांच्या कामांना वेगाने सुरुवात होणार असल्याचे शहर अभियंता मलिकार्जुन बनसोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.