Pimpri : विचार आणि कर्तृत्वातून अटलबिहारी वाजपेयी प्रत्येक भारतीय नागरिकासोबत अमर राहतील

माजी आमदार विश्वासराव गांगुर्डे यांचे मत; सावरकर मंडळातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांची राष्ट्रविकासातील भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी निस्वार्थपणे केलेली राष्ट्रभक्ती संपूर्ण देशात विकासाची मशाल पेटविणारी आहे, असे मत माजी आमदार विश्वासराव गांगुर्डे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांचा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात विश्वासराव गांगुर्डे यांनी त्यांच्या आठवणीतले वाजपेयी उलगडून सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुणे भेटीतील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी सावरकर मंडळाचे सहसचिव प्रदीप पाटील, सदाशिव रिकामे, सुखदा भोंसुले, नरहरी वाघ, विनिता श्रीखंडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात रमेश वाकनिस, चंद्रशेखर जोशी, उज्वला केळकर, विनिता माने यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या 15 अगस्त, आओ फिर से दिया जलाये, टुट सकते है मगर, मैने जन्म नहीं मांगा था, उंचे पहाड पर, मौत से ठल गई, चौराहे पर लुटता चोर, कदम मिलाकर चलना होगा यांसारख्या अजरामर कविता सादर केल्या.

विश्वासराव गांगुर्डे म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी यांची पहिली भेट संघ वर्गात झाली. त्यांच्या संस्कारांचे बाळकडू पहिल्यांदा तिथेच मिळाले. त्यांच्या जीवनातील साधेपणा वाखाणण्याजोगा होता. अत्यंत शिस्तप्रिय, वक्तशीर, राष्ट्राभिमानी, अमोघ वाणीने ओतप्रोत आणि भाषाप्रेमी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असूनही त्यांनी कित्येक वेळा बसने प्रवास केला. ज्या भागात सभा, कार्यक्रमासाठी जात त्या भागातल्या प्रादेशिक भाषेने ते भाषणाची सुरुवात आणि शेवट करत. तसेच भाषणामध्ये सुद्धा योग्य त्या ठिकाणी स्थानिक भाषेचा वापर करत असत”

वाजपेयी यांना एकदा पुण्यात टिळकांच्या नावाने पुरस्कार देण्यात आला. तो पुरस्कार सोहळा 1 ऑगस्ट रोजी होता. पुरस्कार सोहळ्याला जाताना त्यांनी सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांना वाजपेयी यांनी अचानक केलेल्या या कार्यक्रमाबाबत उत्सुकता होती, हे त्यांच्या लक्षात आले. उपस्थितांच्या उत्सुकतेला शांत करताना ते म्हणाले, ‘लोकमान्य के नाम से पुरस्कार लेने जा रहा हूँ, मगर लोकशाहीर को वंदन किये बिना आगे नहीं जा सकता’ असे अनेक प्रसंग गांगुर्डे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन विवेक जोशी यांनी केली. आभार भास्कर रिकामे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.