Avrodh The Siege Within: अवरोध – द सीज विदिनमध्ये बघा सर्जिकल स्ट्राइकचा थरार

Avrodh The Siege Within, new web series अनेक महिने सखोल संशोधन केल्यानंतर आणि लष्करी अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर या घटनेकडे विविध कोनांतून बघणारी कथा आकाराला आली आहे.

एमपीसी न्यूज – पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे त्यावेळी अनेकांना चकित व्हावे लागले होते. 18 सप्टेंबर 2016 रोजी काश्मीरमधील उरी येथे भारतीय भूदलाच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर या हल्ल्याला उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली. ही घटना सर्वांना माहीत आहे, पण या घटनेमागील योजना आणि भारतीय लष्कराने केलेल्या काटेकोर नियोजनाचे तपशील मात्र आजही समोर आलेले नाहीत. ही कथा प्रथमच उलगडून दाखवण्यासाठी सोनी लिवने या महत्त्वपू्र्ण घटनेचा सर्वांत अस्सल लेखाजोखा आपल्या ‘अवरोध – द सीज विदिन’ या पुढील मालिकेमधून सर्वांपुढे आणला आहे.

राहुल सिंग आणि शिव अरुर यांचे प्रसिद्ध पुस्तक ‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’मधील ‘वी डोण्ट रिअली नो फिअर’ या पहिल्या प्रकरणात बेतलेली आणि समर खान यांच्या इरादा एंटरटेन्मेंट एलएलपीने अप्लॉज एंटरटेन्मेंटसाठी निर्माण केलेली अवरोध ही मालिका एका गुप्त मोहिमेभोवती फिरते.

अनेक महिने सखोल संशोधन केल्यानंतर आणि लष्करी अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर या घटनेकडे विविध कोनांतून बघणारी कथा आकाराला आली आहे. ‘अवरोध’मधून प्रेक्षकांना घटनांचे अस्सल दर्शन खिळवून ठेवणा-या व मनोरंजक पद्धतीने मिळेल याची खात्री करण्यासाठी मालिकाकर्त्यांनी मालिकेवर दोन वर्षांहून अधिक काळ मेहनत केली आहे.

राज आचार्य यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अवरोध’मध्ये अभिनेता अमित साधने मेजर टांगो ही भूमिका केली आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणा-या 35 वर्षीय अधिका-याच्या रुपात अमित साध दिसणार आहे.

याशिवाय दर्शन कुमार, पवैल गुलाटी, नीरज कबी, मधुरिमा तुली, अनंत महादेवन, विक्रम गोखले आणि आरिफ झकेरिया हे कलावंत विविध भूमिका साकारत आहेत. या मालिकेचे दहा भाग असून ते 31 जुलैपासून सोनी लिववर प्रसारित होणार आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल अमित साध म्हणतो, ‘एखाद्या प्रतीकाचे स्वरुप प्राप्त झालेली आणि इतिहासात खोलवर रुजलेली व्यक्तिरेखा साकारण्यास मिळणे ही कलावंतासाठी खूपच सुखाची बाब आहे.

अर्थात आपल्याहून खूप थोर अशा व्यक्तिमत्वाच्या अंतरंगात शिरण्याचे आव्हानही त्यात असते. म्हणूनच मेजर विदीप म्हणून जगणे आणि त्यातही भारतीय भूदलाच्या सर्वाधिक चर्चित मोहिमेचे नेतृत्व पडद्यावर साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे.

मला ही संधी मिळाली याबद्दल खूप आनंद वाटतो. मी या भूमिकेला न्याय देऊ शकलो असेन अशी आशाही वाटते. अवरोध हा आम्हा सर्वांसाठी खूपच विशेष अनुभव होता. याबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कधी एकदा जाणून घेतो असे आम्हाला झाले आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.