Talegaon Dabhade : विकार संपल्याशिवाय जीव देवदशेला प्राप्त होत नाही- हभप बाळकृष्ण महाराज वसंतगडकर

एमपीसी न्यूज- कापूराने अग्नी प्रज्वलित होतो, जोवर कापुरातील विकार आहे तोवर अग्नीचे अस्तित्व आहे, कापुरातील विकार गेल्यावर अग्नी देखील विझतो, तसे अध्यात्मामध्ये विकार संपल्यावर, सद्गुरूच्या अंकित झाल्यावर जीव हा देवदशेला प्राप्त होतो. सद्गुरु जीवाला देहदशेतुन देवदशेत नेतात. जीवाला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव करून देतात. तू परब्रम्ह स्वरूप आहेस याचा बोध करून देतात असे उद्गार हभप श्री बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांनी आपल्या निरूपणातून काढले.

आमदार सुनील शेळके व विठ्ठल परिवार मावळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. बुधवारी(दि. १) चौथ्या दिवसाची कीर्तनरुपी सेवेमध्ये हभप बाळकृष्ण महाराज बोलत होते.

हभप बाळकृष्ण महाराज पुढे म्हणाले, ” जीव जेव्हा विदेही अवस्थेला प्राप्त होतो तेव्हा तो सुख दुःखातून मुक्त होतो. अज्ञानी जीव मृत्यूच्या दिशेने वाटचाल करतात तर संत हे मोक्षाचा दिशेने वाटचाल करतात. जीवाला जोवर देहाची आसक्ती जात नाही तोवर त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही. सद्गुरू जीवाला त्याचे देहपण संपवून आत्मबुद्धीवर आणून ठेवतात. असा मोक्षप्राप्ती करून देणारा सद्गुरू शब्दपारंगत, ब्रम्हज्ञानाने परिपूर्ण, व स्वानुभवाने उत्तर देणारा असावा”

“शरीर एक जाते आहे, जाते जसे गोल गोल फिरते तसा जीव चौऱ्यांशी लक्ष योनी फिरतो. जाते फिरताना आरीच्या जीवावर फिरते, जे दाणे आरीच्या बुडाशी असतात ते तसेच असतात, पण जे दाणे बुडाला सोडतात त्याचे पीठ झाल्याशिवाय राहत नाही. तसे जे जीव सद्गुरुबोधशी निष्ठ असतात ते मोक्षाला प्राप्त होतात पण जे अज्ञान जीव सद्गुरूंची संगत करत नाही ते अधोगतीला जातात”

“मनुष्याला कर्म करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे पण फळाचा अधिकार दिलेला नाही, कर्माचे फळ हे त्याच्या प्रयत्न व प्रारब्धावर अवलंबून असते कारण सम प्रमाणात प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळे यश प्राप्त होते, म्हणून या दोन्हींमध्ये प्रयत्नापेक्षा प्रारब्धाला जास्त महत्त्व आहे, प्रारब्ध अनुकूल असेल तर प्रयत्नांना यश मिळते अन्यथा केलेले प्रयत्न वाया जातात. परमार्थामध्ये काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ अहंकार हे षटविकार आहे आणि वासना ही बाधा आहे तिचे जर बीज जाळून टाकले तर ती पुन्हा उत्पन्न होणार नाही. अशी ही वासना ज्यांच्या क्षणभर सहवासाने समूळ नष्ट होते असा संतांचा सहवास व आचरण खूप महत्वाचे आहे. आणि हा सहवास आज मावळ तालुक्यातील सर्व वारकऱ्यांना केवळ आमदार सुनील शेळके यांच्यामुळेच प्राप्त होत आहे” असे हभप बाळकृष्ण महाराज म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like