Baramati News : मुहूर्त पाहून दरोडा टाकणा-या दरोडेखोरांचे शिर्डी, तिरुपतीमध्ये दानधर्म

एमपीसी न्यूज – ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून दरोडा टाकणाऱ्या चार दरोडेखोर आणि त्यांना (Baramati News) मुहूर्त सांगणारा ज्योतिषी यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दरोडा टाकल्यानंतर हे दरोडेखोर थेट शिर्डी आणि तिरुपतीला जाऊन दानधर्म करून आले असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे.

काय आहे घटना

21 एप्रिल रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला आणि तिच्या दोन लहान मुलांसह घरी असताना घराच्या कंपाउंडवरून उडी मारून चार चोरटे घरात आले. त्यांनी महिलेला मारहाण करून हातपाय बांधले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला. घरातून 95 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल फोन असा एकूण एक कोटी सात लाख 24 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Pune : पीएमपीएमएलमध्ये महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोघांना अटक

यांना केली अटक

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) दिला. एलसीबीने तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची ओळख पटवली. चोरी करणारे संशयित आरोपी हे एमआयडीसी परिसरात कामगार असल्याने त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले.

रामचंद्र वामन चव्हाण (वय 43, रा. फलटण, सातारा) असे अटक केलेल्या ज्योतिषाचे नाव आहे. सचिन अशोक जगधने (वय 30, रा. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय 32, रा. इंदापूर), रवींद्र शिवाजी भोसले (वय 27, रा. बारामती), दुर्योधन उर्फ दीपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय 35, रा. फलटण) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

धक्कादायक खुलासे

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ज्या महिलेच्या घरात चोरी झाली, त्या महिलेचा पती जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. म्हणून त्यांच्या घरी दरोडा टाकण्याचा आरोपींनी कट रचला. आरोपी रामचंद्र चव्हाण हा ज्योतिषि असल्याने अन्य चार आरोपींनी त्याच्याकडून चक्क दरोडा घालण्यासाठी मुहूर्त काढला. ज्योतिषाने दिलेल्या मुहूर्तावर आरोपींनी दरोडा घातला.

दरोडा घातल्यानंतर आरोपी शिर्डी साईबाबा आणि तिरुपती बालाजी चरणी नतमस्तक होण्यासाठी गेले. तिथे त्यांनी दानधर्म देखील केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 76 लाख 32 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चार महिन्यात आरोपींनी तब्बल 30 लाख 91 हजार रुपये खर्च (Baramati News) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.