Bhosari : सेवाभावी संस्थांच्यावतीने भुकेल्यांसाठी मायेचा घास, गरजूंना धान्य वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांच्यावतीने भुकेल्यांना मायेचा घास भरविण्यात आला. त्याचबरोबर गरजुंना धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाने गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळाला.

समर्थ रंगावली या ग्रुपच्या वतीने शहरातील बेघर आणि हातावर पोट असलेल्या कामगारांना नाष्टा देऊन एक सामाजिक कार्य केले. त्यातच भर घालत रांगोळीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रबोधन देखील करण्यात आले. हा शिस्तबद्ध उपक्रम भोसरी येथे राबविण्यात आला.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर पुलाखाली नियमित अनेक बेघर, गरजू आणि ज्यांचे हातावर पोट आहे, असे लोक दररोज अजूनही एकत्र येत आहेत. ते सोशल डीस्टन्स पाळत असले तरीही त्यांना वारंवार सांगण्याची गरज आहे. पोटाची भूक प्रसंगी पोलिसांच्या काठ्या खायला देखील भाग पाडते. त्यामुळे या लोकांना मदतीचा हात देण्यासाठी समर्थ रंगवली या ग्रुपच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर पुलाखाली सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत ग्रुपच्या वतीने नाष्ट्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रुपच्या माध्यमातून रांगोळी काढून त्याद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी काय करायला हवे, याबाबत सूचना देण्यात आल्या.

कलाकार संतोष आढाळगे म्हणाले, “पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे पुलाखाली आणि भोसरी गावातील शाळेत या दोन ठिकाणी समर्थ रंगावली ग्रुपच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी नाष्ट्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून तसेच रांगोळीच्या माध्यमातून एका ठिकाणी गर्दी करू नका, हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि मीच माझा रक्षक असे संदेश देण्यात आले.”

श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने लेबर कॅम्पमध्ये धान्य वाटप

श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने वाल्हेकरवाडी येथील लेबर कॅम्पमध्ये धान्य वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय वाल्हेकर आणि अध्यक्ष ॠषभ धारीवाल यांनी धान्य वाटप केले.

वाल्हेकरवाडी येथील लेबर कॅम्पमध्ये 110 कुटुंब राहत आहेत. लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणा-या कामगारांचे अन्नधान्याच्या अभावामुळे हाल होत आहेत. आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेने प्रतिष्ठानच्या माध्यमातून सगळ्यांना 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्य देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखत गर्दी गोळा न करता दोन व्यक्तीनी हा उपक्रम राबवला. आणि तसेच धारीवाल यांनी सर्व सामाजिक संस्था आणि मित्र परिवाराला पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.