Bhosari: इंद्रायणीनगरमध्ये उद्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (रविवारी) जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धांमध्ये दोन हजार 954 खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव संदीप कदम यांनी दिली.

भोसरी, इंद्रायणीनगर येथील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात या स्पर्धा होणार आहेत. रविवारी सकाळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, महापौर राहुल जाधव, बारामती हायटेक पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, कॉमनवेल्थ गेम 2018 चा सुवर्णपदक विजेता राहुल आवारे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या सन्मान करण्यात येणार आहे.

कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रिले या सांघिक व धावणे, कुस्ती, गोळाफेक, थाळीफेक, तायक्वांदो, बुडो मार्शल आर्ट, योगासने या मैदानी स्पर्धा होणार आहेत. गट पातळीवरील विजेते संघ, खेळाडू हे जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.