Bhosari: रेडझोनचा प्रश्न मार्गी लावणार – खासदार डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील संरक्षण खात्यासंदर्भातील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

रेडझोन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाकडून खासदार डॉ. कोल्हे यांनी आज (शुक्रवारी)पुण्यात ‘रेडझोन’ची सविस्तर माहिती घेतली. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, सचिव गुलाबराव सोनवणे, सदस्य यदुनाथ डाखारे, नगरसेवक अजित गव्हाणे, रोहित खर्गे यावेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील विविध ठिकाणी संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या भोसरीतील दिघी, वडमुखवाडी, तळवडे, मोशी, चिखली, यमुनानगर, निगडी परिसरातील नागरिकांना रेडझोनचा सामना करावा लागत आहे. तसेच पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील किवळे, मामुर्डी तसेच देहूरोड, शेलारवाडी, किन्हई, चिंचोली, झेंडेमळा, बोडकेवाडी, माळवाडी (देहू), देहूगाव, विठ्ठलवाडी आदी परिसरातील नागरिकांना या रेडझोनचा सामना करावा लागत आहे. रेडझोन असल्यामुळे विकासकामे करण्यास देखील अडचण येत आहे.

रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी रेडझोनची सविस्तर माहिती दिली. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रेडझोनचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेडझोनच्या हद्दीतील रहिवाशी चिंताग्रस्त आहेत. अनेक घरांवर असलेली टांगती तलवार आहे. ती दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. चालू असलेल्या अधिवेशनातच रेडझोनचा प्रश्न मांडणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे, त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.