Bhugaon : भूगावचा तलाठी आणि कोतवाल 50 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – सात बारा उता-यावर नाव नोंद आणि क्षेत्र नोंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना भूगावच्या तलाठी आणि कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. ही कारवाई आज (गुरुवारी) भूगाव तलाठी कार्यालयात करण्यात आली.

भूगावच्या तलाठी मनीषा सर्जेराव पवार (वय 37) आणि कोतवाल विठ्ठल गुलाब सुर्वे (वय 37) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 33 वर्षीय नागरिकाने तक्रार दिली.

भूगाव येथील एका 33 वर्षीय तक्रारदाराच्या क्षेत्र व वारस नोंद प्रकरणात तहसीलदारांनी नाव नोंद व क्षेत्र नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत तक्रारदाराचे नाव नोंद आणि क्षेत्र नोंद करून घेण्यासाठी तलाठी आणि कोतवाल यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तलाठी कार्यालयात लाच स्वीकारताना तलाठी आणि कोतवाल यांना अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.