Hinjawadi : कोयत्याच्या धाकाने दुचाकीस्वाराला लुटले; दोघांना अटक 

एमपीसी न्यूज – रस्त्यात बंद पडलेली दुचाकी सुरू करत असताना तीन जणांनी दुचाकीस्वाराला मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना बुधवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास चांदणी चौक बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली.

विशाल फुलचंद माळी (वय 19), आशिष मारुती धनके (वय 19, दोघे रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या अन्य एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र अण्णा हिरेमठ (वय 49 रा. आंबेगाव) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र बुधवारी रात्री अकराच्या सुमारास बावधन येथे जात होते. चांदणी चौकात त्यांची दुचाकी बंद पडली. रस्त्याच्या बाजूला घेऊन दुचाकी चालू करण्याचा प्रयत्न करत असताना सीबीझेड मोटर सायकल वरून तिघेजण आले. त्यातील दोघांच्या हातात लोखंडी कोयते होते. दोघांनी रवींद्र यांना पकडले तर एकाने त्यांच्यावर वार केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असे एकूण सहा हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.