Pimpri : शतपावली करत असलेल्या तरुणावर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज – शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला ‘चुगल्या करतो काय’, असे म्हणत चार जणांनी मारहाण केली. तसेच त्याच्यावर ब्लेडने वार केले. ही घटना शनिवारी (ता. 27) रात्री मोरवाडी, पिंपरी येथे घडली.

किरण महेंद्र मोरे (वय 19, रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कुंदन उमेश गायकवाड (वय 19), दादा अशोक कांबळे (वय 26), अक्षय फुले (वय 26, सर्व रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) व त्यांचा अल्पवयीन साथीदार, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी किरण मोरे हे मोरवाडीतील यमुनाबाई मारुती वाघेरे पाटील उद्यानात शतपावली करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी कुंदन गायकवाड याने तू आमच्या चुगल्या लावतोस काय, असे म्हणत मारहाण करण्यास सुरवात केली. इतर आरोपींनीही त्यास बेदम मारहाण केली. गायकवाड याने किरण यांच्यावर ब्लेडने वार केले. यामध्ये किरण गंभीर जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.