Bollywod: ‘बाहुबली’ बरोबर जमणार ‘सुमन’ची जोडी? ‘मैंने प्यार किया’फेम भाग्यश्रीचे ‘कमबॅक’

Bollywod: Suman's pairing with 'Baahubali'? 'Maine Pyar kiya' fame Bhagyashree's 'comeback'

एमपीसी न्यूज – ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सुमनची भूमिका साकारुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी भाग्यश्री आता सिनेसृष्टीत पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. या आधी सलमानसोबत झळकलेली ही अभिनेत्री आता चक्क बाहुबली प्रभाससोबत कमबॅक करणार आहे.

‘मैने प्यार किया’ मधली निरागस सुमन त्यावेळी प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन बसली होती. ही सुमन म्हणजे भाग्यश्री पटवर्धन. या चित्रपटानंतर तिने लगेचच हिमालय दासानीशी लग्न केले, नंतर तिने हिमालयबरोबर काही चित्रपट केले. पण त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून भाग्यश्री काही कौटुंबिक कारणांमुळे सिनेसृष्टीपासून दूर होती. परंतु प्रेक्षकांच्या आग्रहास्तव तिने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. मधल्या काळात तिचा मुलगा पण सिनेसृष्टीच्या वाटेवर होता.

एका मुलाखतीत भाग्यश्रीने आपल्या आगामी चित्रपटाची माहिती दिली. ती म्हणाली, ‘गेल्या काही वर्षांपासून मी रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. खरं तर या दरम्यान मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. वाट्टेल तितके पैसे देण्यास निर्माते तयार होते. परंतु पटकथा न आवडल्यामुळे मी त्या चित्रपटांना नकार दिला’.

‘परंतु माझ्या चाहत्यांपासून मी दीर्घकाळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे चाहते आणि माझी मुलगी यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.’

भाग्यश्री आपल्या कमबॅक चित्रपटामध्ये अभिनेता प्रभाससोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. मात्र लॉकडाउनमुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवावे लागले. या चित्रपटाचे नाव व व्यक्तिरेखेसंदर्भात भाग्यश्रीने काहीही माहिती दिली नाही. येत्या काळात ती या चित्रपटाची अधिकृत घोषणा करेल त्यावेळी सर्वांनाच याबाबत समजेल असं ती म्हणाली. दरम्यान भाग्यश्रीच्या कमबॅकमुळे तिचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.