Boycott Chinese Goods: ‘ड्रॅगन’ला रोखण्यासाठी ‘व्हॅलेट पॉवर’ वापरा, ‘थ्री इडियट्स’च्या ‘रियल हिरो’चा मास्टर प्लान

Boycott Chinese Goods : Use 'Valet Power' to stop 'Dragon', Master Plan of 'Real Hero' of 'Three Idiots'

एमपीसी न्यूज – सध्या सोशल मीडियावर एक डोळे उघडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक ज्यांना आपण सरसकट चिनी म्हणतो असा मंगोलवंशीय माणूस चिनी मालावर बहिष्कार टाका असं चक्क सांगतोय. तुम्ही जर नीट पाहिलंत तर लक्षात येईल की, ती व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध  शिक्षणतज्ज्ञ व इनोव्हेटर सोनम वांगचुक आहेत. हो, बरोबर ओळखलंत…’थ्री इडियट’ या चित्रपटातलं ‘रॅंचो’ म्हणजे ‘फुनसुक वांगडू’ म्हणजेच आमीरखानचं पात्र ज्यांच्यावरुन घेतले तेच सोनम वांगचुक, आपल्याला चिनी मालावर बहिष्कार टाकायचे आवाहन करत आहेत.

सध्या सीमेवर  भारत-चीन सैनिक समोरासमोर आले होते. भारताने प्रतिकाराची तयारी दाखवल्यावर चीनने दोन पावले माघार घेतली आहे. पण चीनची ही खुमखुमी अशी सहजासहजी जिरणारी नाही. ते काहीतरी कुरापती काढणारच. या स्थितीत चीनला धडा शिकवण्यासाठी  सोनम वांगचुक यांनी ‘मेड इन चायना’ मालावर बहिष्कार टाकून त्या देशाची आर्थिक स्थिती कमकुवत करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. चिनी वस्तूंवर इतक्या मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाका की त्या देशाची अर्थव्यवस्था ढासळावी, असे आवाहन त्यांनी केले.

या व्हिडीओत सोनम यांनी सखोल विश्लेषण केले आहे. चिनी सॉफ्टवेअर एक आठवड्यात आणि चिनी हार्डवेअर एक वर्षात बॉयकॉट करायला हवे. चीनमध्ये तयार झालेली एकही वस्तू खरेदी करायची नाही, असा दृढनिश्चय आपल्याला करावा लागेल. मग जे होईल ते होवो…

चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक कोंडी करा – सोनम वांगचुक

सध्या आपण उत्पादन, हार्डवेअर, औषधांसाठीचा कच्चा माल, वैद्यकीय उपकरणे, चप्पल-बूट अशा कित्येक वस्तूंसाठी चीनवर अवलंबून आहोत. कारण, यापैकी अनेक वस्तूंचे आपल्या देशात उत्पादन कमी होते. जे होते, ते महाग असते. मात्र, जनतेने आता ओळखले पाहिजे की चिनी वस्तू खरेदी कराल तर पैसा चीनच्या खिशात जाईल. यातून बंदुका खरेदी करुन त्या आपल्यावरच रोखल्या जातील, याकडे वांगचुक यांनी लक्ष वेधले आहे.

आपण जर आपल्या देशातील थोडे महाग का असेना, देशी सामान खरेदी केले तर पैसा मजूर, कामगार व शेतकऱ्यांसाठी कामी येईल. चिनी वस्तूंवर आपण लगेच बहिष्कार टाकू शकत नाहीत. नियोजनबद्धपणेच ते करायला हवे. हार्डवेअरबाबत एक वर्ष वाट पाहा. त्या काळात देशी कंपन्यांनी इतर देशांतील कंपन्यांकडून ते मिळवण्याचा मार्ग शोधावा. कच्च्या मालाबाबत कंपन्यांनी असेच पर्याय शोधले पाहिजेत.

निर्यात कमी झालेली आत्ताच्या स्थितीत चीनला चालणार नाही. त्यामुळे त्यांच्या देशातील सरकार उलथून पडू शकते. त्यामुळे चीनची मक्तेदारी कमी करुन चिनी वस्तू नसलेल्या बाजारपेठा उभ्या राहायला हव्यात. यात जनतेचाच पुढाकार महत्त्वाचा आहे. सरकारने काय करावे हे जनताच ठरवू शकते. लोकांची मानसिकता बदलली तर आपोआप सरकारचे धोरणही बदलेल. म्हणूनच आता हे पाऊल टाकायला हवे असे कळकळीचे आवाहन सोनम वांगचूक यांनी सगळ्या भारतीयांना केले आहे.

पाहा काय म्हणतायत सोनम वांगचुक….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.