Pune : 72 तासांत बजेट मांडले – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 72 तासांत बजेट मांडल्याचे शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सामान्य पुणेकरांचा बजेटमध्ये विचार करण्यात आला आहे. विधानसभेच्या धर्तीवर महापालिकेत पुरवणी अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे. आपली महापालिका राज्यातील पहिलीच असेल. वर्षभर पैसे येतात, तसे ते खर्च झाले पाहिजे. घरात जसे अर्थशास्त्र वापरतो, तसे महापालिकेत वापरायचे. योजना कागदावर न राहता त्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
उत्पन्न वाढीसाठी आटोमॅटिक घरपट्टी लागेल. पीएमपीएमएलच्या बसेसचा डेपो समाविष्ट गावांत न्यावा. कमर्शियल जागेत तो असू नये, यावर भर देण्यात येणार आहे. मेट्रो 50 वर्षे व्हिजन, गावांचा डीपी प्लॅन, विमानतळ कनेक्टिव्हिटीवर भर देण्यात येईल.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे महापालिकेतर्फे 10 हजार घरे बांधून देण्यात येणार आहे. खराडी, वडगाव (खुर्द) व हडपसर येथील 3 प्रकल्पांसाठी बांधकाम ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. खराडी येथे प्रत्यक्ष जागेवर 786 सदनिकांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. वडगाव खुर्द येथे 1108 व हडपसर येथे 340 सदनिका बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी विकासकाच्या माध्यमातून मौजे लोहगाव, धानोरी व महमदवाडी येथील सुमारे 5 हजार घरांना केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. लोहगाव येथे गृहप्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. धानोरी व महंमदवाडी येथील प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मान्यता मिळण्यासाठी सादर झाले आहेत, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. तर, शिवसृष्टीसाठी लागणा-या जागेची मोजणी सुरू आहे, असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या.

महापालिकेला आणखी 375 कोटी रुपयांची कर्जरोखे काढावी लागणार आहे. त्यासाठी 7.50 टक्के व्याज दर असेल, इतर बँकेचा 12 ते साडे 12 टक्के व्याजदर असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मार्च 2020 पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत साडेचार ते 5 हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.