Pimpri: एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती; सत्ताधारी, विरोधक चिडीचूप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत दोन महिन्यासाठी म्हणजेच 25 जानेवारी 2020 पर्यंत केलेला एकदिवसाआड पाणीपुरवठा यापुढे देखील कायम राहणार आहे. जोपर्यंत 30 एमएलडी जादा पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) सांगितले. दरम्यान, पवना धरणात मुबलक पाणीसाठा असूनही शहरवासीयांना दिवसाआडच पाणीपुरवठा होणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यावर सत्ताधारी भाजप, विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे मात्र शांत आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असताना प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरवासीयांना हिवाळ्यातच एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागले. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा भडीमार पाहता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता.

त्याचवेळी एकदिवसाआड पाणीपुरवठा केवळ दोन महिन्याकरिता म्हणजेच 25 जानेवारी 2020 पर्यंत केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दोन महिन्यात अनधिकृत नळजोड, मोटारी जप्त करुन सुसुत्रता आणाली जाणार होती. दिवसाआड पाणीपुरवठ्याला सत्ताधारी भाजपने समर्थन दिले होते.

एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची मुदत शनिवारी (दि. 25) संपली. त्यामुळे एक दिवसाआड पाणी कपात मागे घेऊन दररोज पाणीपुरवठा होईल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली असून एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवताना दोन महिन्याच्या मुदतीत कोणती सुसुत्रता आणली हे मात्र सांगितले नाही. तसेच दोन महिन्यातील कामाचा देखील आढावा घेतला नाही. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र शांत आहेत. पवना धरणात जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना यापुढे देखील एक दिवसाआडच पाणी मिळणार आहे.

”पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आणखीन 30 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. जादा लागणारे 30 एमएलडी पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत 30 एमएलडी जादा पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे” आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.