Pimpri : आवास योजनेच्या प्रकल्पांची निविदा रद्द करा – दत्ता साने 

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या योजनेमधून महापालिकेच्या माध्यामातून पिंपरी-चिंचवड शहरातील अल्प उत्पन्न असणा-या नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. बो-हाडेवाडी, रावेत, च-होली या भागातील आवास योजनेच्या निविदांमध्ये आव्वाच्या सव्वा दर  देऊन ठेकेदारांशी संगनमत करून सत्ताधारी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच या निविदा रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, बो-हाडेवाडी येथील गृह प्रकल्पाचा दर प्रती स्के.फूट. 2500 रुपये, रावेत येथील गृह प्रकल्पाचा दर प्रति स्के.फूट 2799 रुपये, तर च-होली येथील गृह प्रकल्पासाठी प्रती स्के.फूट  2846 रुपये देण्यात आलेला आहे. वस्तूत: शहरात बांधकामाचा बाजारभावाप्रमाणे प्रती स्के. फूट.  1200 ते  1400 रुपये दर आहे. या दरामध्ये शहरात सर्वोत्तम बांधकाम होऊ शकते. मात्र रावेत, बो-हाडवाडी व च-होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील बांधकामाचा दर अवाच्या सव्वा आहे. यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

एकीकडे सत्ताधारी भाजप काटकसरीचे धोरण राबिवत असल्याचा आव आणत गुच्छ, पत्रिका, हारतुरे यावरील खर्चात कपात करीत आहे. तर, दुसरीकडे अमाप खर्चाच्या निविदा काढून करोडो रुपयांचा घोटाळा करीत आहे. हे म्हणजे न्हाणीला बोळा व दरवाजा उघडा असा प्रकार आहे. त्यामुळे तिन्ही प्रकल्पाच्या निविदा रद्द करून करदात्यांच्या पैशावर डल्ला मारणे थांबवावा. निविदा देशपातळीवर पुन्हा प्रसिद्ध करून निकोप स्पर्धा होऊन महापालिकेची आर्थिक बचत करावी, अशी मागणी साने यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.