Chakan News : एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी एनआयपीएमचा भाग व्हावे – विश्वेश कुलकर्णी यांचे आवाहन

एनआयपीएम (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट) चा 42 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – आपल्या सर्वांगीण विकासासाठी एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचा भाग व्हावे, असे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरच्या वतीने शनिवारी (दि. 19) ऑटो क्लस्टर येथील प्रेक्षागृहात 42 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी बोलत होते.

यावेळी भारत फोर्ज एचआर – आयआर विभागाचे डायरेक्टर डॉ. संतोष भावे, मुळशी तालुका इंडस्ट्रियल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश करंजकर, व्हायब्रंट एचआरचे संस्थापक अध्यक्ष शंकर साळुंके, एनआयपीएम पुणे चॅप्टरचे चेअरमन नरेंद्र पाटील, एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरचे नवनिर्वाचित चेअरमन नवनाथ सूर्यवंशी, सेक्रेटरी अभय खुरसाळे, एनआयपीएम पुणे चॅप्टरचे कमिटी सदस्य श्री व्यास उपस्थित होते.

विश्वेश कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘एनआयपीएम पिंपरी-चिंचवड व चाकण चॅप्टरचे कौतुक आहे तसेच हे चॅप्टर अतिशय सक्रिय असून या चॅप्टर मध्ये तरुण कमिटी मेंबरचा सहभाग हा एक विशेष भाग आहे. एचआर क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या प्रगतीसाठी एनआयपीएम नेहमीच कटिबद्ध आहे व त्यासाठी एनआयपीएम हे राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत असते.

बऱ्याच वेळा असे निदर्शनास आले आहे की कंपन्यांमध्ये कधी कधी विनाकारण एचआर अधिकाऱ्याचा बळी दिला जातो व त्यांना वेळेवर संरक्षण मिळत नाही, जर या देशांमध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी आयएएस अधिकाऱ्यांची संघटना असू शकते, चार्टर्ड अकाऊंट यांची संघटना असू शकते तर एचआर अधिकाऱ्यांची संघटना का असू शकत नाही. म्हणून आपल्या अधिकाऱ्यांनाही योग्य संरक्षण मिळावे यासाठी आपण राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहोत अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली. तसेच त्यांनी एचआर क्षेत्रातील जास्तीत जास्त अधिकाऱ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी एनआयपीएमचे सदस्यत्व स्वीकारावे असे आवाहन केले.

डॉ. संतोष भावे म्हणाले, आपल्या स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दुसऱ्या कोणाशी स्पर्धा न करता आपण आपल्या स्वतःच्याशीच स्पर्धा करणे हे महत्त्वाचे आहे तसेच एचआर अधिकारी म्हणून आपण आपल्या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमी कटिबद्ध असणे व आपला सक्रिय सहभाग नोंदवणे हे अतिशय गरजेचे आहे, त्याचप्रमाणे या क्षेत्रात आपण नेहमी कार्यक्षम राहून आपले वाचन आणि लिखाण जोपासले पाहिजे व आत्मपरिक्षण करणे सुद्धा गरजेचे आहे.

42 वा वर्धापन दिन साजरा करत असताना अनेक क्षेत्रातील मान्यवर, एनआयपीम पीसीसीचे आजीव सभासद व सुमारे 115 कंपनीमधील अधिकारी तसेच उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. महिंद्रा अँड महिंद्रा चाकण माजी एचआर प्रमुख महेश करंदीकर, ट्रायस्टोन कंपनीच्या एचआर प्रमुख अर्चना शेवकरी, येरवा साहेब व डीवाईन एचआरच्या प्रीती साखरे यांची विशेष उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनआयपीएम पीसीसीचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक अमोल कागवाडे, तुषार टोंगळे, होडेक वेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे एचआर आय आर सीनियर जीएम दत्तात्रय नकाते, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स खडकी पर्सनल व आय आर विभागाचे प्रमुख युवराज पवार, एमआयपीएम पीसीसी कमिटीचे उपाध्यक्ष सतीश पवार, सेक्रेटरी अभय खुरसाळे, अतिरिक्त सेक्रेटरी चेतन मुसळे, खजिनदार किशोर शिंदे, सदस्य रमेश बागल, राहुल निंबाळकर, प्रदीप मानेकर, अर्जुन माने, मधुकर सूर्यवंशी, तसेच केतन खिवसरा, दीपक पवार, सावित्री गोसलवाड व तिकम शेखावत यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शितल इंगळे यांनी केले. नवनाथ सूर्यवंशी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.