Chakan : विरुद्ध दिशेने जाणा-या दुचाकीची बसला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने जाणा-या दुचाकीची बसला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी तीनच्या सुमारास चाकण येथील हिरो शोरूम समोर नाशिक-पुणे रस्त्यावर घडली.

निलेश संजय माने (वय 22, रा. स्वप्ननगरी, चाकण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी योगेश भगवान पवार (वय 27, रा. राबिरदवडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास निलेश नंबर नसलेली दुचाकी घेऊन पुणे-नाशिक मार्गवरून जात होता. चाकण येथील हिरो शोरूमजवळ आला असता, त्याची दुचाकी घसरली. त्यामुळे दुचाकीसह तो रस्त्यावरून घसरत गेला. दरम्यान नाशिक-पुणे मार्गावरून जात असलेल्या एका बसच्या मागील चाकाला तो धडकला. यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत वाहतूक विभागाकडून वारंवार नागरिकांना सूचना करण्यात येत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणा-या वाहन चालकांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, स्टंटबाजी किंवा वेळ वाचविण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने दामटली जातात. त्यात अशा प्रकारचे अपघात होऊन वाहनचालकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे, असे आवाहन वाहतुक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.