Chakan Crime News : डोक्यात फुकणी घालून 71 वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून; आरोपी पाच तासांत जेरबंद

एमपीसी न्यूज – फुकणीने डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार करून 71 वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुरकुंडी (ता. खेड) याठिकाणी मृत महिलेच्या राहत्या घरी रविवारी (दि.23) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

सखुबाई बबन राऊत (वय 71, रा.कुरकुंडी, ता. खेड) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे.

याप्रकरणी वृद्ध महिलेच्या सुनेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अनिल सुदाम वाघमारे (वय 53, रा. कुरकुंडी, ता. खेड) याला चाकण पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सखुबाई राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने फुकणीच्या सहाय्याने राऊत यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार करून तिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवडे करीत आहेत.

श्वॉन पथकाच्या सहाय्याने आरोपी पाच तासांत जेरबंद

पोलिसांनी घटनास्थळावर श्वॉन पथक व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण केले. चाकण पोलीसांनी त्वरीत पथके तयार करून संपुर्ण कुरकुंडी गाव पिंजून काढले. घटनास्थळी बारीक -सारीक माहिती जमा केली. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केली. त्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांत गुन्ह्याची उकल करीत आरोपी अनिल सुदाम वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले.

गुन्ह्याच्या तपासात पुणे श्वॉन पथकातील श्वॉन ‘जॅक’ याची मोलाची मदत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.