Chakan Crime News : मनसे शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखले यांच्यासह मनसेच्या 350 कार्यकर्त्यांवर गुन्हा

कोरोना काळात बेकायदेशीरपणे मोर्चा काढल्याचा ठपका

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महाळुंगे येथील एका कंपनीने काही कामगार कमी केले. तसेच काहींना दुसऱ्या  प्लांटमध्ये बदली केले. याला विरोध करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व कामगारांना महाळुंगे येथील कंपनीतच कामावर ठेवण्याच्या मागणीसाठी कोरोना काळात बेकायदेशीरपणे मोर्चा काढला. याबाबत मनसे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आणि अन्य 350 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे पुणे शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे, मनसे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष साबळे, मनसे कामगार सेना सहचिटणीस मनोज खराबी,पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक सचिन चिखले, रुपेश म्हाळसकर, अंकुश तापकीर, तुषार बवले, गणेश नारायण गायकवाड, ओंकार अरुण इंगवले, तसेच जेबीएम कंपनीमधून कामावरून कमी केलेले, दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केलेले कामगार आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते अशा एकूण 300 ते 350 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे जेबीएम कंपनी आहे. कंपनी प्रशासनाने मागील काही दिवसांपूर्वी कंपनीतील काही कामगारांना कामावरून कमी केले. तसेच काही कामगारांची कंपनीच्या दुस-या प्लांटमध्ये बदली केली. यावरून मनसे पक्षाच्या वतीने 8 फेब्रुवारी रोजी दुपारी कंपनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

जेबीएम ऑटो लिमिटेड कंपनीने कमी केलेल्या तसेच दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केलेल्या कामगारांना महाळुंगे येथील प्लांटमध्येच कामावर घ्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असताना तसेच मोर्चासाठी परवानगी नसताना आरोपींनी मोर्चा काढला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 143, 188, साथीचा रोग प्रतिबंधक कायदा सन 1897 चे कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.