Chakan: चाकणमध्ये विमानतळ होणे गरजेचेः खासदार डाॅ अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – खासदार डाॅ अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत आपल्या भाषणात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे, चाकण परिसरात विमानतळ होण्याची गरज असून मंत्रालयाने आपल्या या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली.

चाकणमध्ये विमानतळ होण्याची गरज अधोरेखित करताना खासदार डाॅ अमोल कोल्हे म्हणाले की चाकण परिसरात अनेक विकसित औद्योगिक क्षेत्रे (एमआयडीसी) असून तेथे परदेशातील अनेक नामवंत कंपन्यांचे कारखाने आहेत. तसेच चाकण परिसरात अनेक प्रयोगशील शेतकरी असून ते आपला बहुतांश माल परदेशी निर्यात करून परदेशी चलन देशाला मिळवून देतात.

भीमाशंकर, आळंदीसारखी अनेक धार्मिक क्षेत्रे व संपूर्ण राज्याचे आराध्यस्थान, शिवनेरीसारखी महत्त्वाची पर्यटनस्थळे चाकण परिसरात आहेत. म्हणूनच या परिसरातून निर्यात होणारा शेतमाल, विविध कंपन्यांची उत्पादने व पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने या परिसरात विमानतळ निर्माण करावे व चाकणवासीयांसाठी प्रगतीची कवाडे खुली करावीत, असेही खासदार कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.