Chandrapur News : आमटे कुटुंबातील वाद आणि डॉ. शीतल यांची आत्महत्या

एमपीसी न्यूज – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या महारोगी सेवा समितीचे विश्वस्त मंडळ आणि आमटे कुटुंबीयांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद असल्याची चर्चा सुरु होती. डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी समितीच्या विश्वस्त मंडळावर आणि कार्यकर्त्यांवर समाजमाध्यमांद्वारे आरोप केले होते. मात्र, आमटे कुटुंबात कोणतेही वाद नाहीत, आमटे कुटुंब एकदिलाने काम करत आहे. तसेच डॉ. शीतल या मानसिक तणावात असल्याचे निवेदन 22 नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांनी प्रसिद्ध करून या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र, आठ दिवसानंतर आज (सोमवारी, दि. 30) डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केली. त्यामुळे आमटे कुटुंब आणि आनंदवन याबाबतच्या चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे.

डॉ. शीतल यांचा भाऊ कौस्तुभ आमटे यांना काही वर्षांपूर्वी महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळातून काढून टाकले होते. त्यानंतर कोरोना काळात समितीच्या विश्वस्त मंडळाची ऑनलाईन सभा झाली. त्यात 14 विरुद्ध 2 अशा मतांनी कौस्तुभ आमटे यांना पुन्हा विश्वस्त मंडळावर घेण्यात आले. या ठरावाच्या वेळी डॉ. शीतल आमटे-करजगी आणि त्यांचे पती गौतम करजगी यांनी विरोधात मत नोंदवले असल्याची माहिती आहे. तेंव्हापासून डॉ. शीतल अस्वस्थ होत्या.

त्यांनी मागील आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदवनातील कार्यकर्ते आणि आमटे कुटुंबातील व्यक्तींवर जाहीर आरोप केले होते.

काही कालावधीनंतर सोशल मीडियावरून ती पोस्ट देखील काढण्यात आली. त्यावर महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. शीतल यांचे वडील विकास आमटे आणि सहसचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी डॉ. शीतल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले आरोप फेटाळून लावले होते.

आमटे कुटुंबीयांनी याबाबत सविस्तर निवेदन 22 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते.

डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षरीनिशी जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते की, “आनंदवन लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आमटे कुटुंब मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल गौतम करजगी (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) यांनी आमच्या संस्थेच्या कार्यात योगदान दिले आहे.

तथापि, डॉ. शीतल गौतम करजगी या ताण, नैराश्य याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुली देत महारोगी सेवा समिती या संस्थेच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल अनुचित वक्तव्य केले.

त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. डॉ. शीतल करजगी यांच्या निवेदनामुळे कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे.

आमच्या संस्थेच्या सर्व लाभार्थी, कार्यकर्ते, सहयोगी यांना आम्ही आमटे कुटुंब एकदिलाने आश्वस्त करतो की, संस्थेचे कार्य मागील सात दशकांच्या परंपरेला अनुसरून यापुढेही आम्ही करीत राहू.

आमच्या नैतिक भूमिकांशी ध्येय उद्दिष्टांशी आजन्म प्रामाणिक राहू. आमच्या प्रत्येक प्रकल्पात नैतिक – कायदेशीर मूल्ये आणि पारदर्शकता कायमच जपली जाईल. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये, हीच विनंती आम्ही सर्व करीत आहोत.”

कोण होत्या डॉ. शीतल आमटे

डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांच्या कन्या होत्या. त्यांनी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. एमबीबीएस झाल्यानंतर आजोबांनी सुरु केलेल्या आनंदवनात काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.

दरम्यान, त्यांचा गौरव करजगी यांच्याशी विवाह झाला. डॉ. शीतल या अपंगत्व विशेषतज्ञ म्हणून ओळखल्या जात होत्या. महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य म्हणून डॉ. शीतल आमटे-करजगी या काम पाहत होत्या.

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

डॉ. शीतल या मागील काही दिवसांपासून मानसिक तणाव आणि नैराश्यात असल्याचे आमटे कुटुंबियांकडून 22 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. डॉ. शीतल यांनी त्यांच्या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये देखील त्यांनी त्याची कबुली दिल्याचे आमटे कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते.

सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) डॉ. शीतल यांनी प्राथमिक माहितीनुसार, विषारी इंजेक्शन टोचून घेतले. त्यानंतर त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.