Pimpri News : लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा- छत्रपती संभाजीराजे

एमपीसी न्यूज : लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी आज पिंपरी येथे केली आहे. (Pimpri News) महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी आज 8 डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहर बंद पुकारला आहे. त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. बहुजन महापुरुष सन्मान समिती यांचे आज दिवसभर या संदर्भात धरणे आंदोलन सुरू असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज या बंदला पाठिंबा देण्यासाठी आज दुपारी पिंपरी येथे आले होते. त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

आंदोलकांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. जे कोणी हे मानत नाही त्यांचा कडेलोट होतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती महाराजांबाबत दोनवेळा वादग्रस्ते विधाने केली आहेत. तरी देखील त्यांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही. कसली एवढी मग्रुरी आहे हे कळत नाही. आता यांनी दिलगिरी व्यक्त केली तरी आता आम्ही ती मान्य करणार नाही.

ते म्हणाले की, ” काल जालना बंद झाला. आज पिंपरी चिंचवड तर उद्या महाराष्ट्र बंद होण्यासाठी वेळ लागणार नाही. पण अजुनही वेळ गेलेली नाही. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि कोश्यारींना महाराष्ट्र बाहेर काढा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत, हे आम्ही सहन करणार नाही. अहो पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करा.(Pimpri News) शिवाजी महाराज हे पक्षापलीकडलं व्यक्तीमत्व आहे.आजच्या बंद मध्ये दोन पक्षांचे लोक सहभागी झाले नाहीत मी जर त्या पक्षांशी निगडित असतो तर पक्षाचा दवाब झुगारून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आलो असतो असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून सतत महापुरुषांचा अपमान होत आहे त्यामुळे या मागे कोणते षडयंत्र आहे का? असे विचारले असता, ते म्हणाले की, “ते चित्र  विचित्र वाक्य बोलत आहेत. आणि आमच्या सारख्या सामान्य माणसाला वाटणारच ना मग या मागे काही षडयंत्र आहे का? प्लॅन आहे का? नियोजन आहे का?”

Digambar Bhegade: मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अजून पदावरून हटवले नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करताना, ते म्हणाले की, “पिंपरी चिंचवड शहरात बंद पुकारण्यात आला.(Pimpri News) हीच भूमिका महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्र बंद होवू नये अशा मताचा मी आहे. पण मला अजूनही आश्चर्य वाटते की ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकदा नाही दोनदा अवमान केला आहे. सावित्रीबाई, महात्मा फुले यांचा अवमान केला आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात कसे ठेवले आहे.”

आम्हाला हा राज्यपाल नको , त्याला महाराष्ट्रातून बाहेर (हाकलून द्या) पाठवून द्या. हे जर घडले नाही तर महाराष्ट्र बंद शिवाय पर्याय नाही. राज्यपालानंतर तीन व्यक्तींनी छत्रपतींचा अवमान केला . किती दिवस हे सहन करायचे कधीतरी पक्षाच्या पुढे पाहिले पाहिजे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राज्यपाल हटवण्याच्या मागणी संदर्भात विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, त्यांनी योग्य ठिकाणी ती पोहचवली आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “प्रधान मंत्री व राष्ट्रपतींच्या माध्यमातून नेमणूक होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा विषय का ठेवला आहे. परवा माझ्या कानावर आले की ते म्हटले आम्ही ज्या ठिकाणी विषय पोहोचवायचा त्या ठिकाणी पोहोचवला आहे. काय विषय पोहचवला तुम्ही ते सांगा. कुठे पोहचवला ते सांगू नका. या कोश्यारींची हकालपट्टी करा.”

छत्रपती संभाजीराजे यांनी पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी जमलेल्या लोकांना संबोधित केले.

यावेळेस सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस चे विनायक रणसुभे व विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बंद मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, आम आदमी पार्टी या सारखे राजकीय पक्ष सहभागी आहेत.(Pimpri News) तसेच 100 हून अधिक विविध पुरोगामी सामाजिक संघटना जसे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, प्रहार व इतर संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. शहरातील औद्योगिक संघटना देखील बंद मध्ये सहभागी आहेत. तसेच सर्व मुस्लिम संघटना या बंदमध्ये सहभागी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.