Chikhali Crime News : कारकुनाच्या नजरचुकीने येरवडा कारागृहातून सुटला; नऊ महिन्यांनी पुन्हा तीन गुन्ह्यात सापडला

एमपीसी न्यूज – येरवडा कारागृहात वाहन चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला एक आरोपी कारागृहातील कारकुनाच्या नजरचुकीमुळे कारागृहातून बाहेर पडला. मात्र, त्याने गुन्ह्यांचे सत्र सुरूच ठेवले. शेवटी नऊ महिन्यांनी पोलिसांनी पुन्हा त्याला तीन गुन्ह्यात अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली.

संतोष उर्फ बबलू मधुकर धनसरे (वय 23, रा. गायकवाड गल्ली, उमरदरी, ता. मुखेड, जि. नांदेड) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. नऊ महिन्यांनंतर त्याच्यासह त्याचे तीन साथीदार अजय रमेश भालेराव (वय 25, रा. मोरवाडी, पिंपरी), अभिषेक उर्फ पांडू अरुण जगधने (वय 22, रा. कळवा ईस्ट, ठाणे), संजय अजित तिरके (वय 24, रा. हडपसर, पुणे) यांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस चिखली परिसरात गस्त घालत असताना सहाय्यक उपनिरीक्षक नारायण जाधव आणि पोलीस शिपाई तुषार काळे यांना माहिती मिळाली की, घरफोडी आणि वाहनचोरी करणारे आरोपी साने चौक, चिखली परिसरात आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेला एक घरफोडी आणि वाहन चोरीचा तसेच पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला वाहन चोरीचा एक गुन्हा केल्याचे मान्य केले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 43 हजारांचे दागिने, 95 हजारांच्या दोन दुचाकी असा एकूण एक लाख 38 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपी संतोष धनसरे हा येरवडा कारागृहात एका वाहनचोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. त्यावेळी त्याच्यावर आणखी तीन वाहन चोरीच्या गुन्ह्यांचे खटले सुरु होते. पहिल्या गुन्ह्यात त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला 12 जानेवारी 2021 रोजी कारकुनाची नजरचुकीने मुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून तो फरार होता. चारही आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहाय्यक उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस अंमलदार प्रवीण दळे, संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, आदिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.