Chikhali: चिखलीतील सांडपाणी प्रकल्पाला स्थगिती; हरित लवादाचा निर्णय

फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने दाखल केली होती तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथे इंद्रायणी नदी पात्रालगत उभारण्यात येणा-या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला हरित लवादाने स्थगिती दिली आहे.

पर्यावरणाची हानी होऊ नये आणि नदीचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधात जून 2019 मध्ये फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. हा प्रकल्प अनधिकृतपणे इंद्रायणी नदी पात्रालगत निळ्या पूररेषेत महापालिका उभारत आहे. याबाबत तक्रार करूनही महापालिकेने काम सुरूच ठेवले. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली.

मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली. तरीही काम सुरूच राहिल्याने रिव्हर रेसिडेन्सीने हरित लवादाकडे न्याय मागितला. त्यावर सुनावणी होऊन लवादाने 22 जून रोजी सविस्तर अहवाल मागविला. त्यानुसार 6 जुलैला स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर अंतिमत: प्रकल्पाला स्थगिती दिली. सद्यःस्थितीत प्रकल्पाची पाया भरणी व सीमाभिंत बांधणीचे काम पूर्ण झाले आहे.

महापालिकेने ही जागा प्रकल्पासाठी आरक्षित केली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रकल्प इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्याविरोधात आंदोलन देखील झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.