Chinchawad Bye-Election: उद्धव ठाकरे आणि राहुल कलाटे यांच्यात फोनवर संभाषण; ठाकरे म्हणाले राहुल तुम्ही….

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (Chinchawad Bye-Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल कलाटे यांच्याशी फोनवर संवाद साधला. राहुल तुम्ही तरुण आहात. तुम्हाला चांगले राजकीय भविष्य आहे. त्यामुळे तुम्ही माघार घ्यावी असा निरोप ठाकरे यांनी कलाटे यांना दिला आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याची राहुल कलाटे यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर शिवसेने नेतृत्वाने हालचाली केल्या आहेत. आज सकाळीच संपर्कप्रमुख सचिन अहिर वाकड येथे दाखल झाले. त्यांनी कलाटे यांची समजूत घातली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कलाटे यांचे बोलणे करुन दिले.

Chinchawad Bye-Election : माघार घेण्याबाबत कलाटे यांचे मोठे विधान, म्हणाले उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण…

माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले, राहुल कलाटे हे आमच्या विचाराने आजपर्यंत काम करत आले आहेत. त्यांची समजूत घालण्यासाठी मी आलो होतो. त्यांचे राजकीय भवितव्य अंधकारमय होणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कलाटे यांचे बोलणे झाले आहे. तुम्ही तरुण आहात. भविष्यकाळात राजकीय दृष्टीकोनातून मदत केली जाईल. तुम्हाला चांगले राजकीय भविष्य आहे. त्यामुळे तुम्ही माघार घ्यावी असा निरोप पक्षप्रमुखांनी दिला आहे.

आता कलाटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलाटे माघार घेतात का हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.