Chinchawad Bye-Election : माघार घेण्याबाबत कलाटे यांचे मोठे विधान, म्हणाले उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण…

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे (Chinchawad Bye-Election) यांनी अपक्ष दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी झाली. उपनेते सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कलाटे यांचा संपर्क करुन दिला. ठाकरे यांच्यासोबत कलाटे यांची 5 ते 7 मिनिटे फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचा अनादर करायचा नाही. पण, माझ्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर माघारीबाबतचा निर्णय घेणार असल्याचे कलाटे यांनी सांगितले. त्यामुळे नेत्यांच्या मनधरणीला यश येते का, कलाटे माघार घेतात का, हे दुपारी तीननंतर स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कलाटे यांचे बंड शमविण्यासाठी महाविकास आघाडीकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर हे वाकड येथे दाखल झाले. त्यांच्यासोबत शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार आदी पदाधिकारी होते.

सचिन अहिर आणि राहुल कलाटे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर अहिर यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावला. कलाटे आणि ठाकरे यांच्यात फोनवर 5 ते 7 मिनिटे बोलणे झाले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल कलाटे म्हणाले, पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chinchawad Bye-Election) यांचा निरोप घेऊन उपनेते सचिन अहिर आले होते. मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोणताही अनादर करायचा नाही. पण, माझ्या सोबत असलेल्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेईल. समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घ्यायचा की नाही हे ठरवेल आणि निर्णय जाहीर करेन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.