LokSabha Elections 2024 : चिंचवडला रंगला मावळचा रणसंग्राम

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी आणि भाजपने मावळ मतदारसंघावर (LokSabha Elections 2024) केलेला दावा, विकासाचे दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप अशा परखड चर्चेमुळे मावळ लोकसभेचा रणसंग्राम चिंचवडला चांगलाच रंगला.

एका संस्थेच्या वतीने आयोजित चर्चा संवादात मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यात सहभागी झाले होते.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मावळ मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षात झालेल्या विविध विकासकामांची जंत्री खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी सादर केली. अजूनही काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून काही नियोजनात आहे. हीच विकासकामे घेऊन आगामी निवडणुकीत जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी भाजपच्या चिन्हावर उभा राहणार नसून शिवसेनेचाच उमेदवार असल्याचा दावाही बारणे यांनी यावेळी केला. बारणे म्हणाले, महत्त्वपूर्ण अशा नदीसुधार प्रकल्पास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. सर्व औद्योगिक पट्यात मलनिस्स:रण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. पिंपरी पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. संरक्षण क्षेत्राविषयक प्रश्नांचा (LokSabha Elections 2024) उच्चस्तरीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे रेड झोनचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटेल.

संजोग वाघेरे म्हणाले की, मावळ मतदारसंघाच्या विकासाबाबत केले जाणारे दावे फोल आहेत. विकास कुठेही दिसून येत नाही. हजारो कोटींचा निधी मावळसाठी मिळाला असूनही त्याचा विनियोग झालेला नाही. रायगड जिल्ह्यातील अनेक उद्योजक सुविधा मिळत नसल्याने पळून गेले आहेत. स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्याने युवक निराश आहेत. रेडझोन, पाणी प्रश्न, आरोग्यव्यवस्था, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. पिंपरी चिंचवड शहराला अद्यापही दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नद्या प्रचंड अस्वच्छ आहेत. पिंपरी ते निगडी मेट्रोचा विस्तार झाला नाही. हिंजवडी मेट्रो पिंपळे सौदागर मार्गे जाणे अपेक्षित आहे. पुणे लोणावळा लोकल फेऱ्यांमध्ये व्हायला हवी. कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी रेल्वेस्टेशनचा विकास झाला नाही. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या शहरात थांबल्या पाहिजेत. गडकोट किल्ले व लेण्यांचे संवर्धन झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. कारखान्याचे स्थलांतर थांबले पाहिजे. वाड्या वस्त्यांवर अध्यापही वीज, रस्ते, पाणी नाही. पनवेल मनपा मधील मिळकत धारकांना दुहेरी कर आकारला जातो. आयुक्तांकडून पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होतो आहे. शेतकरी, गरीब, कामगार, युवकांच्या कल्याणाचे धोरण राबवण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. स्वातंत्र्याचा शतकोत्तर महोत्सव 2047 मध्ये साजरा करताना, भारत देश महासत्ता होण्यासाठी 2024 ची निवडणूक पायाभरणी ठरणारी आहे. मावळ मतदारसंघावर भाजपचा पूर्वीपासूनच दावा आहे. संपूर्ण मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे. पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता भाजपला मावळ मतदारसंघ मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र, सरतेशेवटी वरिष्ठ नेते महायुतीचा जो उमेदवार देतील. तो निवडून आणण्याची जबाबदारी शहर भाजपा पूर्ण करेल, असे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहर, हिंजवडी आणि लगतच्या परिसरातील उद्योग, व्यवसायाची घडी शरद पवार यांच्यामुळेच बसली. जेएनएनयुआरएमचा भरीव निधी शरद पवारांनी मिळवून दिला. मावळ लोकसभेत आतापर्यंत उध्दव ठाकरे यांचाच पॅटर्न यशस्वी ठरला आहे. ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक मुद्द्यांवरही लढली जाणार आहे. तळेगाव येथील वेदांत- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला स्थलांतरित केला. तेव्हा खासदारांनी विरोध करायला हवा होता. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाने जे काही केले, ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. सध्या कर्ज काढून अर्थव्यवस्था फुगवण्याचे काम सुरू असल्याचे दिसते, असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात काम करण्यास भरपूर वाव आहे, प्रत्यक्षात त्या प्रमाणात तेथे विकासाची कामे होऊ शकलेली नाहीत. येथील नद्यांना गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठी गुंतवणूक करणाऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नामांकित कंपन्या गुजरातमध्ये नेण्यात आल्या. असे होत असताना अर्थव्यवस्था कशी वाढणार. याउलट गुन्हेगारी वाढतच राहील. देशाची व राज्याची स्थिती सध्या गंभीर आहे. त्या दृष्टीने विचार केला पाहिजे.

Alandi : आळंदीमध्ये मोठ्या उत्साहात धुळवड साजरी

पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा अजित पवार यांच्यामुळे बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर होता. अजूनही मावळ लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नसल्याने आम्ही मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करणार आहोत. विजय शिवतारे कालपर्यंत शिवसेनेत होते. त्यांच्या काही विधानांमुळे राजकीय वातावरण बिघडले आहे. बारामतीत ते महायुतीचा धर्म पाळणार नसतील तर आम्हाला मावळात वेगळा विचार करावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणी कमी लेखू नये, ही आमची भूमिका आहे. शिवतारे यांनी महायुतीतून बाहेर पडून बंडखोरी केल्यास त्याचा इतरत्र परिणाम होणार नाही. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत, असे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.