Chinchwad: येरवडा कारागृहातून पळालेला दुसरा आरोपी वाकड पोलिसांच्या जाळ्यात

Chinchwad: Another accused who escaped from Yerawada jail has been nabbed by Wakad police येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जवळ बार्टीच्या एका वसतिगृहात तात्पुरते कारागृह बनविण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून शनिवारी (दि.13) पहाटे दोन आरोपी पळाले. त्यातील एका आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. दुस-या आरोपीला वाकड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

आकाश बाबूलाल पवार (वय 24, रा. काळेवाडी) असे वाकड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अर्शद हनिफ सय्यद (वय 20, रा. सोनार चाळ, कासारवाडी) याला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली होती.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जवळ बार्टीच्या एका वसतिगृहात तात्पुरते कारागृह बनविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कारागृह बनविण्यात आले असून कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी हे कारागृह बनविण्यात आले आहे.

शनिवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास या तात्पुरत्या कारागृहाच्या खिडकीचे गज उचकटून अर्शद सय्यद आणि आकाश पवार हे दोघेजण पळाले.

या घटनेमुळे कारागृह पोलिसांसोबत पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली. दोन्ही कैदी पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क झाले.

वरिष्ठांनी याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत माहिती काढून पळालेल्या कैद्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश पवार हा काळेवाडी येथे येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शाम बाबा यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बालाजी लॉन, काळेवाडी येथे सापळा लावून आरोपीला अटक केली.

आरोपी आकाश पवार हा 13 जून रोजी येरवडा कारागृहातून पळून गेला होता. तेव्हापासून वाकड पोलिस त्याच्या मागावर होते.

मे महिन्यात वाकड पोलिसांनी आरोपी पवार याला खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळीही त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपी आकाश पवार याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक हरिष माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर तपास पथकातील पोलीस कर्मचारी शाम बाबा, सागर सुर्यवंशी, बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, जावेद पठाण, नितीन ढोरजे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, दिपक भोसले, तात्या शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.