Chinchwad : कोरोनापासून बचाव होईल सुद्धा पण भुकेनं मरू त्याच काय ; सुरक्षारक्षकांची व्यथा

एमपीसी न्यूज – कोरोनाचा हाहा:कार सर्व जगात पसरला असून, कित्येक देश संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सुद्धा 21 दिवसांसाठी संपूर्ण लाॅकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी इतर राज्यांच्या सर्व सीमा व राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा जीवनावश्यक सोडून सगळ्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षणासाठी व नोकरी निमित्त शहरात आलेले विद्यार्थी व नोकरवर्ग येथेच अडकून पडला. यामुळे बॅंक, एटीएम, शोरुम, माॅल, इन्सुरन्स, फायनान्स कंपनी, सोसायटी याठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे हाल होत आहेत. यामध्ये सुरक्षारक्षकांची तर अतोनात हाल होत आहेत.

सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लाॅकडाऊन मुळे चांगलेच हाल होत आहेत. खानावळ, हाॅटेल्स बंद असल्याने त्यांची दोन वेळच्या जेवणाची गैरसोय होत आहे. तसेच नेमणूक केलेल्या ठिकाणी तासंतास थांबावे लागते व ठिकाण सोडता येत नसल्याने दुसऱ्या ठिकाणाहून खाण्यास काही घेऊनही येता येते नाही. त्यामुळे मोठी पंचायत होत आहे.

शाळा, महाविद्यालय बंद असल्याने कुटुंबातील सर्व गावाला गेली आणि अचानक लाॅकडाऊनची घोषणा झाल्यामुळे ते गावालाच अडकून पडले. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर बारा तासांची शिफ्ट आहे. कंपनीकडून कोणतीच सुविधा पुरविण्यात येत नाही तसेच कोणतीही चौकशी होत नसल्याने चिंता वाटत असल्याची भावना सुरक्षारक्षक व्यक्त करत आहेत.

जे बॅचलर सुरक्षारक्षकांची नोकरी करतात, त्यांच्यावर लाॅकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. शिफ्ट बदलीसाठी येणारा दुसरा कर्मचारी कोरोनाच्या भीतीने गावाला गेल्यामुळे काही सुरक्षारक्षकांना 24 तास एकाच ठिकाणी ऑन ड्युटी थांबावे लागत आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पहारा देणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या पोटाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

 औद्योगिकनगरीत  सुरक्षारक्षकच असुरक्षित!

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन केले आहे. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कंपन्या, लघुद्योग, शोऊम बंद आहेत मात्र कंपन्यांच्या सुरक्षेसाठी या परिस्थितीत देखील सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यांच्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यांच्या सुरिक्षततेसाठी उपाययोजना केलेल्या दिसून येत नाही. दिवसभर खडा पहारा देऊन आस्थापनांची सुरक्षा करणारे सुरक्षारक्षकच असुरक्षित आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक, कामगारांची नगरी आहे. त्यामुळे राज्याच्या नव्हे तर देशाच्या विविध भागातील नागरिक आपली उपजिविका भागविण्यासाठी शहतात आले आहेत. मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. शहरात विविध औद्योगिक कंपन्या, आयटी पार्क, एमआयडीसी आहे. शोऊम, कार्पोरेट कार्यालये, शैक्षणिक संकुले, सिनेमागृहे, मॉल, बँका या प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असतात. याशिवाय बीआरटीएस, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील सुरक्षारक्षक असतात.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहर शटडाऊन आहे. जीवघेण्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण घरात बसून आहे. सुरक्षिततेची काळजी घेत आहे. परंतु, सुरक्षरक्षकांना कोणतीही सुट्टी नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येते. मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करुन दिले नाहीत. सुरक्षारक्षकांची आठ ते बारा तास पाळी असते.

बीआरटीएसमधील सुरक्षारक्षकांकडे  कायम  दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्गावर देखील सुरक्षा रक्षक तैनात आहे. पीएमपीएमएस बस सेवा बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठीच बस सोडली जाते. तरी, देखील सुरक्षारक्षकांना घरी राहण्याची मुभा देण्यात आली नाही. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने घरी जाण्यासाठी देखील सुरक्षारक्षकांना अडचणी येतात. तीव्र उन्हात सायकलवर सुरक्षारक्षक घरी जाताना दिसून येतात.

 

माझे लग्न झाले असले तरी कोरोनाच्या भितीने बायको आणि दोन महिन्यांच्या लहान मुलाला मी गावाला पाठवले आहे. माझा सहकारी सुद्धा कोरोनाच्या भीतीने अचानक गावाला गेला. त्यामुळे गेली चार दिवस एकाच ठिकाणी अडकून पडलो आहे. जवळपास जेवणाची सोय नसल्याने व येथून कुठे जाता येत नसल्याने कोरोनाच्या आगोदर भुकेने मरतो की काय, अशी परिस्थिती झाली आहे “- विलास शिंदे, फायनान्स कंपनीचा सुरक्षारक्षक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.