Chinchwad : देवेंद्र फडणवीस साधणार तरुणाईशी राजकारण विरहित मुक्त संवाद

'मोरया युथ फेस्टिवल'चे शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असणा-या विविध कलागुणांना मुक्त व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील कर्तव्य फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस ‘राजकारण विरहित विविध विषयांवर तरुणाईशी मुक्त संवाद’ साधणार आहेत. हा कार्यक्रम शनिवारी (दि.11) सकाळी साडेनऊ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे.

‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’च्या उद्‌घाटन समारंभासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर, नगरसेवक बाबू नायर, कामगार नेते इरफान सय्यद आदी उपस्थित राहणार आहेत.

कर्तव्य फाउंडेशन ही संस्था शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात विविध गुण, कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. यावर्षी आयोजित केलेल्या युवा महोत्सवामध्ये विविध 28 स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये शहरातील चार हजार पेक्षा अधिक युवक युवतींनी सहभाग घेतला आहे.

युथ फेस्टिवल मध्ये बुध्दीबळ, कॅरम, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथा लेखन, कथा सादरीकरण, व्यंगचित्र काढणे, रायफल शुटिंग, टेबल टेनिस, फेशन शो, व्हॉलिबॉल, ऑन द स्पॉट पेंटींग, पोस्टर मेकिंग, एकांकिका, वेशभूषा नसताना एकांकिका सादरीकरण, मूक अभिनय, नकला सादर करणे, रांगोळी आणि मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. युथ फेस्टिव्हल आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.