Vadgaon Maval : मंजूर झालेला विकासनिधी इतर प्रभागात वळविल्याच्या निषेधार्थ मोर्चा

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या वार्ड क्र 17 मधील मंजूर झालेला 88 लाखांचा निधी रद्द करुन इतर प्रभागात वळविण्याचा घाट घातला असून त्यांच्या निषेधार्थ माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर व गटनेते दिनेश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील नागरिकांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढला.

या मोर्चात माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, दिपाली मोरे, सुनिता भिलारे, शामराव ढोरे, दशरथ केंगले, वडगाव भाजपा शहराध्यक्ष किरण भिलारे, रवि म्हाळसकर, अनंता कुडे, वैशाली म्हाळसकर, आदीसह नागरीक उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातुन व वडगांव नगरपंचायतील भाजप नगरसेवकांच्या परिश्रमातुन संबधित प्रभागामध्ये विकासकामे करण्यासाठी 88 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र हा विकास निधी नगरपंचायत प्रशासन व नगराध्यक्ष यांच्या संगनमताने इतरत्र वळवण्यात येत आहे. जोपर्यंत आमच्या प्रभागातील मंजूर निधीचे काम सुरु होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रभागात काम होऊ देणार नाही असा इशारा अर्चना म्हाळसकर यांनी दिला.

गटनेते दिनेश ढोरे यांनीही नगरपंचायतीत मनमानी कारभार व सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. उदघाटन झालेल्या विकासकामांच्या निविदा येत्या पंधरा दिवसांत काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी अन्यथा या विरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी मागण्याचे निवेदन नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांना देण्यात आले. मुख्याधिकारी ओगले यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्या येत्या दोन दिवसांत जागेवर येऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले.

मंजूर कामे मे महिन्यात मार्गी लावु – नगराध्यक्ष मयूर ढोरे

मंजूर झालेला निधी माघारी जाणार नसुन ज्या प्रभागात निधी मंजूर झाले आहेत. त्या प्रभागातील कामे येत्या मे महिन्यापर्यंत मार्गी लावु तसेच उर्वरित कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २ कोटींचा निधी उपलब्ध होणार असल्याचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी मोर्चेकरांना आश्वासन देताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.