Chinchwad : फ्लॅट, जमीनीवर ताबा मारत बंटी-बबली घालताहेत सामन्यांना गंडा

एमपीसी न्यूज – फ्लॅट तसेच जमीनीवर अनधिकृतपणे (Chinchwad) ताबा मारून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत चिंचवडमधील बंटी-बबलीने शहरात धुमाकूळ घातला आहे. शहरातील तसेच खानदेशातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून उजळमाथ्याने वावरत आहेत. यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी फसवणूक झालेल्या काही जणांनी पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवले. मात्र, अद्याप पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

शहरात घरांना मोठी मागणी आहे. त्यामुळे घर तसेच जागांना सोन्याचे भाव आहेत. याचाच गैरफायदा घेत चिंचवड येथील फसवणूक करणारी महिला तिच्या साथीदारासोबत मिळून मिळकतींचे व्यवहार करते. परजिल्ह्यातील अनेकांना स्वस्तात मिळकत देण्याचे ते आमिष दाखवतात. काही रक्कम आता द्या, उर्वरित रक्कम नंतर द्या, असे म्हणून अनेकांकडून पैसे घेतात. तसेच बनावट साक्षीदार, कागदपत्रे सादर करून फसवणूक करत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्हेकरवाडी येथील एका इमारतीमधील काही फ्लॅटवर या बंटी बबलीने अनधिकृतपणे ताबा मारून फ्लॅटधारकांचे साहित्य घराबाहेर टाकले. त्याबाबत संबंधित फ्लॅटधारकांनी डायल 112 या हेल्पलाइन क्रमांकावर काॅल केला. तसेच संबंधित फ्लॅटधारकांनी चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, दीड-दोन वर्षांपासून त्यांना केवळ चौकशी करू, असे आश्वासन पोलिसांकडून दिले जात आहे.

फ्लॅटवर अनधिकृत ताबा मारल्याप्रकरणी संबंधित फ्लॅटधारकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्याकडे चौकशीसाठी व निरीक्षणासाठी हे प्रकरण पाठवण्यात आले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, प्रकरण आणि (Chinchwad ) फाइल तेथेच राहिले. यात चौकशी होऊन अद्याप गुन्हा दाखल झाला नाही, असे फ्लॅटधारकांचे म्हणणे आहे.

Maharashtra Rain : सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन

फसवणूक करणारी महिला आणि तिचा साथीदार हे नातेवाईक आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य देखील या प्रकारांमध्ये सहभागी असल्याचे काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे. फसवणूक प्रकरणी चौकशी करून संबंधित महिला आणि तिच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. तसेच विद्यमान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे देखील तक्रारदारांनी कैफियत मांडली. मात्र, त्यानंतरही याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

फसवणूक झालेल्या काही जणांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडले. न्याय मिळवून द्या, अशी मागणी केली. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाणे, उपायुक्त कार्यालय तसेच पोलीस आयुक्तालयात देखील याबाबत पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली. मात्र, त्यांनाही दाद न मिळाल्याने फसवणूक झालेले नागरिक हतबल झाले आहेत.

शहरातील काही आरक्षित जागांचेही व्यवहार करून दस्त म्हणून नोटरी करून दिल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत असल्याने या बंटी-बबली विरोधात याप्रकरणी संबंधित नागरिक तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. या बंटी-बबलीवर कायदेशीर कारवाई करून फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.