Chinchwad  : आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांनाही धान्य द्यावे : मीनल यादव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

एमपीसी न्यूज : देशभरात लॉकडाऊन सुरु असल्याने  पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक घरी बसून करोना विरोधात लढा देत आहेत. मात्र, यामध्ये हातावर पोट  असलेले अनेक गोरगरिब नागरिक, मजूर, रोजंदारीवरील कामगार व हमालांचे अन्नधान्यावाचून हाल होत आहेत. आधार लिंक केलेल्या रेशनकार्ड धारकांना रेशनवर धान्य उपलब्ध होऊ लागले आहे. आजही असंख्य नागरिकांचे आधार कार्ड रेशनकार्डला  लिंक नसल्याने त्यांना रेशनवरील धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. अशा नागरिकांनाही प्राधान्याने धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मोहननगर -आकुर्डी प्रभागातील शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.  

याबाबत  त्यांनी  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  २१ दिवसांचा  लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. नागरिक घरी बसून सरकारला कोरोनाच्या लढ्यात सहकार्य करीत आहेत.  मात्र,  या लढाईत हातावरचे पोट असलेले गोरगरीब नागरिक घरात अन्नधान्य नसल्याने हवालदिल झाले आहेत. रोजगार नसल्याने त्यांच्याकडे पैसेही नाहीत. त्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे.

 या पार्श्वभूमीवर अन्नधान्यावाचून गोरगरिबांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने  रेशन दुकानांमधून पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३  रुपये किलो दराने  तांदूळ  उपलब्ध  करून दिला आहे. शिवाय प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळही मोफत देण्यात येणार आहे. मात्र, सध्या आधार लिंकिंग झालेल्या रेशनकार्ड धारकांनाच हे धान्य मिळत आहे. तर आधार लिंक नसलेले रेशनकार्ड धारक या धान्यापासून वंचित राहणार आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीचा विचार करून आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकालाही धान्य देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.