Chinchwad News : डॉ. संजय शिंदे यांनी अपर आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे शहरात कार्यरत असलेले डॉ. संजय शिंदे यांची बदली करण्यात आली. बुधवारी (दि. 25) डॉ. संजय शिंदे यांनी रामनाथ पोकळे यांच्याकडून अपर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या नुकतेच बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे अपर पोलीस आयुक्त पदावर बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुणे शहर येथे कार्यरत आलेल्या डॉ. संजय शिंदे यांची वर्णी लावण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी कार्यान्वित झाले. आयुक्तालय स्थापनेनंतर मकरंद रानडे यांना पहिले अपर पोलीस आयुक्त पद भूषवण्याचा मान मिळाला. दहा महिन्यात त्यांची पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर अमरावती परिक्षेत्र येथे बदली झाली.

रानडे यांच्या नंतर रामनाथ पोकळे यांनी मे 2019 मध्ये पिंपरी चिंचवड अपर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, त्यांचा आयुक्तालयातील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची ठाणे शहर येथे नुकतेच बदली करण्यात आली. त्यांच्या रिकाम्या जागेवर पुणे येथील डॉ संजय शिंदे रुजू झाले आहेत.

पोलिस दलात शांत व संयमी अशी ओळख असलेल्या डॉ. संजय शिंदे याना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी रत्नागिरी, कल्याण, सातारा, लातूर, चंद्रपूर अशा शहरांमध्ये काम केले आहे. तसेच, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देखील त्यांनी प्रमुख पदांची धुरा सांभाळली आहे. या दरम्यानच्या काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाच्या विशेष पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.