Chinchwad News: गजानन चिंचवडे समाजासाठी स्वत:ला वाहून घेतलेला कार्यकर्ता होता; सर्वपक्षीय नेत्यांची भावना

एमपीसी न्यूज  – गजानन चिंचवडे यांनी माणुसकी जपली. जुने मित्र टिकविले, नवीन मित्र जोडत गेले. त्यांचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे होते. पक्षश्रेष्टी, नेतृत्वाने दिलेली जबाबदारी अतिशय व्यवस्थित पार पाडायचे. त्याच्याकडे आळस नावाचा प्रकार नव्हता. त्यांनी समाजासाठी स्वत:ला वाहून घेतले होते, अशा भावना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या. तसेच गजानन यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे यांना आगामी महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून देण्यास सर्वपक्षीय नेत्यांनी सहमती दर्शविली.

शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. गांधी पेठ तालीम मित्र परिवाराच्या वतीने रविवारी (दि. 27) गजानन चिंचवडे यांच्या शोकसभेचे आयोजन केले होते. चिंचवडेनगर येथील युनिक व्हिजन स्कूल येथे झालेल्या शोकसभेला चिंचवडे यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, महापौर उषा ढोरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हनुमंत गावडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सचिन चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप, शिवसेनेच्या महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शांताराम भालेकर, मानव कांबळे, संतोष कलाटे, वंदना पिंपळे, ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. मनोज देवळेकर, संघवी केसरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस.बी. सुरवसे, अशोक पगारिया, सीए भूषण तोष्णिवाल, कटारिया सर, युनिक व्हिजन स्कूलच्या सविता मिश्रा, रवि नामदे, मारुती बहिरवाडे, रामभाऊ जमखंडी, महेश बारसवे, दुर्गेश देशमुख आदी उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ”गजानन चिंचवडे याची एक बहिण ढोरे परिवारामध्ये दिलेली आहे. तेव्हापासून गजानन याच्याशी परिचय होता. कौटुंबिक नाते होते. गजाननने समाज कार्यकरताना कौटुंबित नातेसंबंधही जोपासले. गजानन अतिशय उमदा, मनमिळावू कार्यकर्ता होता. झोकून देऊन तो काम करत होता. अश्विनी चिंचवडे यांच्या रुपाने तो समाजकार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वच राजकीय नेते साथ देतील अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”गजानन 30 वर्षांपासून माझ्यासोबत होता. सावलीसारखा माझ्यापाठीशी उभा राहिलेला अतिशय जवळचा मित्र, विश्वासू सहकारी अचानक सोडून गेला याचे खूप वाईट वाटत आहे. त्याच्यावर कोणत्याही जबाबदारी दिली की तो चोखपणे पार पाडत होता. जबाबदारीने घेऊन, झोकून देऊन तो काम पूर्ण करत असे. माझ्या कार्यक्रमाच्या आयोजनात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे होते. पक्षश्रेष्टी, नेतृत्वाने दिलेली जबाबदारी अतिशय व्यवस्थित पार पाडायचा. त्याच्याकडे आळस नावाचा प्रकार नव्हता”. गजानन चिंचवडे यांच्या आठवणी सांगताना खासदार बारणे भावूक झाले. त्यांचे डोळे पानावले होते. त्याच्या कार्याचा वारसा त्याच्या पत्नीने सुरु ठेवावा आपण सदैव साथ देऊ अशी ग्वाही खासदार बारणे यांनी दिली.

नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी ”गजानन चिंचवडे यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. गांधीपेठमध्ये केलेली कामे, गणेशोत्सावत केलेली कामे सांगितली. गजानन चिंचवडे यांची शिक्षण मंडळावर कशी वर्णी लावली याबाबतच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

शंकर जगताप म्हणाले, ”मी नगरसेवक असताना गजानन शिक्षण मंडळाचा सदस्य होता. त्यावेळी आमची चांगली मैत्री झाली. तेव्हा गजाभाऊने केवळ जनतेसाठी, जनतेच्या हिताचे काम करायचे असल्याचे सांगितले होते. गजाननच्या पत्नी अश्विनी चिंचवडे यांच्याशी पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. आगामी निवडणुकीत त्यांना बिनविरोध निवडून द्यावे”.

राजाभाऊ गोलांडे म्हणाले, ”गजाजन चिंचवडे याने माणुसकी जपली. जुने मित्र टिकविले, नवीन मित्र जोडत गेला. नवीन मित्र जोडण्याची त्याला आवड होती. समाजासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. महाविद्यालयापासून तो राजकारणात सक्रिय होता. गजानन अचानक आपल्याला सोडून जाईल असे कधी वाटले नव्हते. त्याच्या जाण्याने शाळेपासूनचा, अतिशय जवळचा मित्र मी गमावला आहे”.

धनंजय गावडे यांनी ”आगामी महापालिका निवडणुकीत गजानन चिंचवडे यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली”. युनिक व्हिजन स्कूलच्या सविता मिश्रा यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजपाचे जेष्ठ नेते महेश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात चिंचवडमधील गावडे चिंचवडे भोईर यांच्या सोबतीने त्या ठिकाणी ब्राम्हण समाजाचीही मत आहेत. ब्राम्हण समाजही अश्विनी चिंचवडे यांच्या मागे ठामपणे उभा राहील या संदर्भातील भूमिका ब्राम्हण महासंघांचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी जाहीर करतील असे सांगितले

https://www.youtube.com/watch?v=uVLyW-2i5XI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.