Chinchwad News : अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची कुंडली काढण्याचे काम सुरु – पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा पथक आणि पोलीस ठाण्याकडून शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, काही अधिकारी अवैध धंद्यांना अभय देण्याचे काम करत असल्याची कुणकुण पोलीस आयुक्तांच्या कानावर गेली आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यांची कुंडली काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांनी जनरल बदल्या होणार असून त्यामध्ये अशा अधिका-यांची साईड ब्रांचला उचलबांगडी केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सप्टेंबर 2020 मध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. काही दिवसातच सामाजिक सुरक्षा पथक हे कारवायांच्या जोरावर आयुक्तांच्या गळ्यातील ताईत झाले.

या पथकाने सात महिन्यांच्या कालावधीत 175 पेक्षा अधिक अवैध धंद्यांवर कारवाया केल्या आहेत. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर या कारवाया झाल्या आहेत, त्या त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर आयुक्तांकडून अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.

पोलीस निरीक्षकांनी सामाजिक सुरक्षा विभागाबाबत केलेल्या तक्रारींवरून आयुक्तांनी पथकातील सात कर्मचा-यांची तडकाफडकी बदली केली. सामाजिक सुरक्षा विभागातून बदली केलेल्या कर्मचा-यांना तात्पुरत्या कालावधीसाठी सामाजिक सुरक्षा विभागात काम दिले होते.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान त्यांची पडताळणी झाली असून त्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठवले असल्याची सारवासारव पोलीस आयुक्तांनी केली आहे. या प्रकरणावरून पोलीस वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

सामाजिक सुरक्षा विभाग नवनवीन कारवाया करीत आहे. त्यापैकी बहूतांश अवैध धंद्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनाही माहिती नव्हती. मात्र मटका, जुगार, स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्‍या व्यवसाय या अवैध धंद्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती असणारच आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत त्यांची वेगळी नोंद केली जात आहे.

काही प्रकरणांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकास खुलासा विचारण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची कार्यक्षम नसल्याचे कारण देत त्यांची बदली केली जाणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

सामाजिक सुरक्षा पथकामध्ये आयुक्‍तांची खास माणसे

सामाजिक सुरक्षा पथकामध्ये आयुक्‍तांची खास माणसे आहेत. ही माणसे कारवाई दरम्यान कोणी गडबड करीत नाही ना, किंवा सामाजिक सुरक्षा पथकाच्या नावाखाली कोणी वसुली करीत नाही ना, याबाबतचा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्‍तांना देत असतात. याच माहितीच्या आधारे सात कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठविण्यात आल्याचेही पोलीस आयुक्‍त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.