Chinchwad : शिक्षकच समाज घडवू शकतो -डॉ. एन.एस.उमराणी

एमपीसी न्यूज – सध्याचे युग हे गतिशील आणि बदलणारे आहे. तसेच ते वाणिज्य आणि व्यापाराचे आहे. देशातील आर्थिक समृद्धी ही व्यवसाय, व्यापार विविध प्रकारच्या उद्योग समूहावर अवलंबून असते. बदलत्या तंत्रज्ञानामध्ये विविध ठिकाणी कुशल योग्य प्रशिक्षीत पदवीधर तरुणाची आवश्यकता असते. यासाठीच वाणिज्य विभागातील विविध अभ्यासक्रमांना महत्त्व वाढले आहे. त्यामुळे शिक्षकच समाज घडवू शकतो, असे मत उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ कॉर्मस अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीच्या संयुक्त विद्यमाने पुणे, बारामती, शिक्रापूर, नर्‍हे, आळंदी-हडपसर, वाघोली, सुपे-अहमदनगर, पिंपरी-चिंचवड परीसरातील महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापकासाठी इम्प्लिमेन्टेंशन ऑफ चाईस बेस्ट क्रेडिट सिस्टिम (निवड आधारीत मूल्यांकन पद्धत अंमलबजावणी) एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ.एन.एस. उमराणी यांच्या हस्ते डिजिटल दिव्यांनी सजविलेल्या समईचे दिवे रिमोटद्वारे प्रज्वलित करून करण्यात आले. या कार्यशाळेला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • यावेळी व्यासपीठावरती कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. क्षितीजा गांधी, प्रा. अनामिका घोष आदी उपस्थित होते.

यावेळी उपकुलगुरू प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “भारतामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी चॉईस बेस के्रडीट सिस्टिम”या पदध्तीचा अवलंब केला आहे. विद्यार्थ्यांची आवड, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला हव्या त्या विषयाची निवड करता यावी या उद्देशाने चॉईस बेस के्रडीट सिस्टीम (निवड आधारित मूल्यांकन पद्धत) लागू करण्यात आली आहे. काळानुसार असणार्‍या गरजाचा विचार सर्वांगीण दृष्टीने करून त्याला पूरक अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. व्यापार, उद्योगक्षेत्रात चमक दाखवतील, असे पदवीधर विद्यार्थी घडवायचे आहे. त्यांना सर्व माहिती, ज्ञानाचे अचूक आकलन होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

  • इतरत्रही अशाप्रकारचे कार्यशाळेचे आयोजन शिक्षकांसाठी करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या शिक्षकावर अपार विश्वास आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बदलत्या स्वरूपातील शिक्षण देऊन आदर्श समाज घडवायचा आहे. त्यामुळेच देशाचा विकास होण्यास हातभर लागणार आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आपल्याला आवडत असलेला विषय घेऊन शिकता येणार आहे. यापुढे शिक्षण शिक्षक केंद्रीत न राहता विद्यार्थी केंद्रीत होण्यास मदत होईल. शैक्षणिक दर्जा राखण्यास मदत होणार आहे.

संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठ शिक्षण मिळण्यास मदत होईल. भारतातील विद्यार्थी देशभरातील विद्यार्थ्यांबरोबर विविध क्षेत्रात स्पर्धा करता येईल, अशी नवीन शिक्षण प्रणाली असणे काळाचीच गरज होती. शिक्षकांनी ज्ञान आत्मसात केले तरच विद्यार्थी घडू शकतील. यापुढे शिक्षकांचा कसोटीचा काळ असणार आहे. एकेका वर्गात शंभर विद्यार्थ्यांना शिकविणे हे एका शिक्षकाना पेलवणारे नाही, याचा विचार होणे देखील काळाची गरज आहे.

  • दिवसभरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता ए.डी.शाळीग्राम वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. वाय.एम.मिठारे, पिंपरी येथील डॉ. डी.वाय.पाटील, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रणजित पाटील यांनी शिक्षण पद्धतीतील बदलाबाबत मार्गदर्शन करून विविध शिक्षकांच्या प्रश्नांची समर्पकपणे उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरसण केले.

संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्याहस्ते विविध व्याख्यातेचे सत्कार शाल, स्मृतीचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत प्रा. तुलिका चॅटर्जी यांनी केले. आभार उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे यांनी केले. एक दिवसीय कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ.क्षितीजा गांधी, प्रा. अनामिका घोष, प्रा. हर्षिता वाच्छानी, प्रा. अब्रा प्रतिप रे यांनी संयोजनासाठी विशेष परीश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.